For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनआयए महासंचालकपदी सदानंद दाते

06:30 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
एनआयए महासंचालकपदी सदानंद दाते
Advertisement

एनडीआरएफला मिळाला नवा प्रमुख : बीपीआरडी महासंचालकपदी राजीव शर्मा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अन् आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याला मोदी सरकारने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. तर एनडीआरएफच्या महासंचालकपदी आयपीएस अधिकारी पीयूष आनंद यांची वर्णी लागली आहे. आयपीएस राजीव कुमार शर्मा यांना पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे (बीपीआरडी) महासंचालक करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने मंजुरी दिली आहे.

Advertisement

सदानंद दाते यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्त करण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशात नमूद आहे. एनआयएचे वर्तमान महासंचालक दिनकर गुप्ता यांची ते जागा घेणार आहेत. गुप्ता हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

तर आयपीएस राजीव कुमार शर्मा हे पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून बालाजी श्रीवास्तव यांचे स्थान घेतील. श्रीवास्तव देखील 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. तर एनडीआरएफचे महासंचालक म्हणून पीयूष आनंद हे अतुल करवाल यांच्या जागी नियुक्त होणार आहेत.

एनआयएचे नवे महासंचालक सदानंद दाते यांना कठोर निर्णय घेणारे अधिकारी म्हणून ओळखले जाते. यापूर्वी 2015 मध्ये त्यांना सीआरपीएफचे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दाते हे 1990 च्या महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. नक्षलवादविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे.

एनआयए सध्या जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, पंजाबसमवेत अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि जगातील अन्य हिस्स्यांमधील खलिस्तानी कारवायांप्रकरणी चौकशी करत आहे. याचबरोबर देशभरातील पीएफआयच्या हिंसक कारवायांचा तपास एनआयएकडून करण्यात येत आहे. आयपीएस सदानंद दाते यांनी महासंचालक पद स्वीकारल्यावर एनआयएच्या या मोहिमांना आणखी वेग मिळणार असल्याचे मानले जात आहे. 26/11 च्या हल्ल्यावेळी दाते यांनी अतुलनीय शौर्य दाखविले होते.

Advertisement
Tags :

.