एकता कपूरला इंटरनॅशनल एमी पुरस्कार
पहिली भारतीय महिला ठरली : वीरदास ठरला सर्वोत्कृष्ट विनोदवीर
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
51 व्या इंटरनॅशनल एमी पुरस्कारांची घोषणा झाली आहे. दिग्दर्शिका-निर्माती एकता कपूरला दिग्दर्शनासाठी यंदाचा एमी पुरस्कार मिळाला आहे. भारतीय महिलेला या पुरस्काराने गौरविण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर कॉमेडियन वीरदासने कॉमेडीसाठी इंटरनॅशनल एमी पुरस्कार पटकाविला आहे. दिल्ली क्राइम 2 या सीरिजमधील अभिनयासाठी शेफाली शाह यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते, परंतु त्यांना हा पुरस्कार मिळू शकलेला नाही. शेफाली यांच्याऐवजी या श्रेणीचा पुरस्कार कार्ला राउज यांना मेक्सिकन सीरिज ‘ला काइडा’साठी मिळाला आहे.
इंटरनॅशनल एमी पुरस्कार सोहळा न्यूयॉर्कमध्ये पार पडला आहे. यात 14 श्रेणींमध्ये 20 देशांच्या एकूण 56 जणांना नामांकन प्राप्त झाले होते. या पुरस्काराला टेलिव्हिजनचा ऑस्कर पुरस्कार म्हटले जाते.
श्रेणी विजेते
सर्वोत्कृष्ट अभिनेता मार्टिन फ्रीमॅन (द रिस्पॉन्डर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कार्ला राउज (मेक्सिकन सीरिज ला काइडा)
टीव्ही शो/मिनी सीरिज ला काइडा
सर्वोत्कृष्ट विनोदवीर वीरदास (डेरी गर्ल्स सीरिज)
सर्वोत्कृष्ट मिनी सीरिज ला सिएडा
किड्स लाइव्ह अॅक्शन हार्टब्रेक हाय
किड्स फॅक्चुअल-एंटरटेन्मेंट बिल्ट टू सर्वाइव्ह
किड्स अॅनिमेशन द स्मेड्स अँड दा सूम्स
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फॉर्म सीरिज डेस जेन्स बिन ऑर्डिनिरेस
नॉन स्क्रिप्टेड एंटरटेन्मेंट द ब्रिज ब्रेसिल
सर्वोत्कृष्ट क्रीडा माहितीपट हार्ले अँड कत्या
इंटरनॅशनल अवॉर्ड ड्रामा सीरिज द एम्प्रेस
इंटरनॅशनल अवॉर्ड माहितीपट मारीयूपोल
एमी पुरस्कार देशात आणतेय
एकता कपूरला डायरेक्टरेट अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील योगदान आणि सहसंस्थापक म्हणून बालाजी टेलिफिल्म्स प्रॉडक्शन हाऊस सेटअप करण्यासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. तुमचा एमी पुरस्कार भारतात आणत आहे. प्रतिष्ठित एमी डायरेक्टरेट पुरस्कार प्राप्त करून अत्यंत आनंदी आहे. अशाप्रकारे जागतिक स्तरावर सन्मानित होणे अत्यंत आनंदाची बाब असल्याचे तिने म्हटले आहे.