ऍमेझॉनचे कर्मचारी कपातीचे संकेत
जवळपास 10 हजार कर्मचारी कमी करणार : कंपनीमध्ये रोबोटचा वापर वाढविण्यावर देणार भर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अमेझॉन या ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनीकडून 10,000 लोकांना नोकरीतून काढून टाकण्यात येणार आहे, न्यूयॉर्क टाइम्सनुसार ही माहिती देण्यात आलीय. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, पुढील आठवडय़ात हजारो नोकऱया जाणार आहेत. गेल्या काही तिमाहीत नफा न मिळाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
आर्थिक मंदी कायम आहे, त्यामुळे कंपनीने आपला खर्च कमी करण्यासाठी सदरचा निर्णय घेतला असल्याचे समजते. कंपनीने गेल्या आठवडय़ात नोकरभरती थांबवली असल्याचे जाहीर केले होते. अनेक कर्मचाऱयांना इतरत्र नोकरी शोधण्याचेही सांगण्यात आले असल्याचे सांगितले जाते. तथापि, ऍमेझॉनकडून टाळेबंदीबाबत कोणतेही विधान अद्याप समोर आलेले नाही. ऍमेझॉनमध्ये किती कर्मचारी आहेत आणि माणसांची जागा रोबोट्स कशी घेत आहेत? हे जाणून घ्यावे लागणार आहे.
ऍमेझॉनच्या 31 डिसेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार, 16 लाखांहून अधिक पूर्णवेळ आणि अर्धवेळ कर्मचारी कंपनीत आहेत. जर कंपनीने एकाच वेळी 10,000 कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले तर ऍमेझॉनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असेल. एकूणच, कंपनी आपल्या 1 टक्के कर्मचाऱयांना काढून टाकण्याची तयारी करत आहे.
मानवाची जागा घेतोय रोबोट्स
कंपनीच्या अनेक युनिट्समध्ये काम करण्यासाठी आता रोबोट्सचा वापर करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून आले आहे. ऍमेझॉनमधील रोबोटिक्सचे प्रमुख टाय ब्रॅडी म्हणाले की, पुढील पाच वर्षांमध्ये पॅकेजिंगमध्ये 100 टक्के रोबोटिक प्रणाली असू शकेल. यामुळे भविष्यात मानवी कामगारांची जागा रोबोट घेतील, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे संकेत त्यांनी दिले.
फेसबुक-व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामची कपात
18 वर्षांत प्रथमच फेसबुक, व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स यांनी 11,000 कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासात एवढय़ा मोठय़ा संख्येने कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ राहिली आहे.