उत्तर-मध्य भारतात थंडीची लाट तीव्र
मध्यप्रदेश-राजस्थानच्या 18 शहरांमध्ये तापमान 10 सेल्सिअसच्या खाली हवामान...
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या उत्तरेकडील राज्यांसोबतच आता मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्येही थंडीचा प्रभाव वाढत आहे. शनिवारी राजस्थान आणि मध्यप्रदेशातील 18 शहरांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली पोहोचले. यामध्ये राजस्थानमधील 9 आणि मध्य प्रदेशातील 9 शहरे आहेत. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरनंतर आता हिमाचल प्रदेशातही बर्फवृष्टी सुरू होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. चंबा, कांगडा, लाहौल स्पीती आणि कुल्लू जिह्यात आज बर्फवृष्टी होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीपूर्वीच राज्यातील 4 शहरांतील तापमान मायनसमध्ये गेले आहे. लाहौल स्पितीमधील ताबोचे किमान तापमान उणे 8.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. सामडोमध्ये किमान तापमान 1.3 अंशांनी, कुकुमसैरीमध्ये 4.1 अंशांनी आणि केलॉन्गमध्ये 2.0 अंशांनी घसरले आहे. थंडीबरोबरच देशातील 9 राज्यांमध्ये दाट धुक्मयाचा इशाराही जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या सोनमर्गमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-कारगील हा मार्गही काही काळ बंद करण्यात आला होता. इतर भागातही हिमवृष्टी होत असून पर्यटक याचा आनंद लुटत आहेत.
देशात थंडीबरोबरच धुक्मयाचा प्रभावही सातत्याने वाढत आहे. बिहारमध्ये धुक्मयामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे रेल्वेगाड्यांना उशीर झाला. तसेच विमानांच्या टेकऑफ आणि लँडिंगलाही विलंब झाला. मध्यप्रदेशातही थंडीचे वातावरण सुरू झाल्यामुळे आता शाळांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. भोपाळमधील अनेक खासगी शाळांनी वेळेत 30 मिनिटांची वाढ केली आहे. इंदूर, जबलपूर, ग्वाल्हेर-उज्जैनमध्येही वेळा बदलण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वीपासून मध्यप्रदेशात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.
दिल्लीसह आसपासच्या राज्यांमध्ये वातावरणात बराच फरक पडला असून प्रदूषण पातळीही अतिगंभीर स्थितीत पोहोचली आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये तापमान सामान्यपेक्षा 2 अंशांनी घसरले. बिहारमध्ये वाढत्या थंडी आणि धुक्मयामुळे रेल्वेगाड्यांच्या वेग मंदावला आहे. धुके आणि थंडीच्या लाटेमुळे पाटणा रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांना तासन्तास रेल्वे स्थानकावर प्रतीक्षा करावी लागत आहे.
मध्यप्रदेशात थंड वाऱ्यांमुळे थंडीचा प्रभाव आहे. त्यामुळे आता शाळांच्या वेळेतही बदल करण्यात येत आहेत. भोपाळमधील अनेक खासगी शाळांनी वेळेत 30 मिनिटांची वाढ केली आहे. राजस्थानमध्ये थंडीचा कडाका वाढण्यासोबतच दाट धुके पडू लागले आहे. उत्तर राजस्थानच्या 8 जिल्ह्यांमध्ये सकाळी दाट धुके पसरले होते.