ईपीएफ चा व्याजदर 8.50 टक्क्यांवर जैसे थे
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ईपीएफच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची 228 वी बैठक आज जम्मू-काश्मीर मधील श्रीनगर येथे पार पडली. केंद्रीय कामगार आणि रोजगार (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तर अपूर्व चंद्रा, सचिव (कामगार आणि रोजगार) हे उपाध्यक्षस्थानी होते तसेच सदस्य सचिव सुनील बर्थवाल आणि केंद्रीय पी एफ आयुक्त देखील या बैठकीला उपस्थित होते.
केंद्रीय मंडळाने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी सदस्यांच्या खात्यात ईपीएफची रक्कम जमा झाल्यावर 8.50% वार्षिक व्याज दराने रक्कम जमा करण्याची शिफारस केली. सरकारच्या राजपत्रात व्याजदर अधिकृतपणे सूचित केल्यानंतर ईपीएफओ ग्राहकांच्या खात्यात व्याजदराची रक्कम जमा केली जाईल.
आर्थिक वर्ष 2014 पासून ईपीएफओने सातत्याने 8.50 टक्के किंवा त्याहून अधिक दराने परतावा दिलेला आहे. कंपाऊंडिंगसह उच्च ईपीएफ व्याज दरामुळे, ग्राहकांच्या नफ्यात महत्त्वपूर्ण फरक पडतो. यापूर्वी, 2012-13 मध्ये दर 8.50 टक्के असे किमान होते. तुलनेत 2016-17 मध्ये 8.68 टक्के, 2017-18 मध्ये 8.55 टक्के, 2015-16 मध्ये 8.80 टक्के असे अधिक होते. यंदा हा दर 8.50 टक्के राहणार असून कोरना आणि लॉकडाउननंतरही यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.