इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू
हिजबुल्लाहकडून क्षेपणास्त्र हल्ले : दोन भारतीय जखमी
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलमध्ये झालेल्या एका क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. मृत इसम हा केरळचा रहिवासी होता. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून ते देखील केरळचे रहिवासी आहेत. लेबनॉनमधून सोमवारी एक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. इस्रायलच्या उत्तर सीमावर्ती वसाहत मार्गालियटनजीकच्या एका उद्यानात हे क्षेपणास्त्र कोसळले होते.
या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या तावडीत तीन भारतीय सापडले. या तिघांनाही जिव रुग्णालयात नेण्यात आले, जेथे केरळच्या कोल्लमचा रहिवासी पटनीबिन मॅक्सवेलला मृत घोषित करण्यात आले. तर बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेल्विन यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जार्ज यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर ईजा झाली आहे. पेटा टिकवा येथील बेलिन्सन रुग्णालयात जॉर्ज यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. जॉर्ज यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांनी भारतात राहत असलेल्या कुटुंबीयांशी संवाद देखील साधला आहे. तर मेल्विन हे किरकोळ जखमी झाले आहेत.
भारतीय कामगार मोठ्या संख्येत इस्रायलमध्ये रोजगार मिळविण्यासाठी जात असताना हा हल्ला झाला आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या कराराच्या अंतर्गत भारतातून मोठ्या संख्येत लोक इस्रायलमध्ये कामासाठी जात आहेत.
इस्रायलमध्ये करण्यात आलेला क्षेपणास्त्र हल्ला हा लेबनॉनमधील हिजबुल्लाह गटाने केला असल्याचे मानले जात आहे. गाझापट्टीत सुरू असलेल्या युद्धादरम्यान हिजबुल्लाह हमासच्या समर्थनार्थ सातत्याने उत्तर इस्रायलमध्ये रॉकेट, क्षेपणास्त्रs आणि ड्रोनद्वारे हल्ले करत आहे. इस्रायलने या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनॉन शहरातील चिहिने शहरातील हिजबुल्लाहच्या तळावर हवाई हल्ले केले आहेत. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्षात इस्रायलचे 7 नागरिक आणि 10 सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. तर लेबनॉनमध्ये 200 हून अधिक जण मारले गेले आहेत.
इस्रायलच्या सुरक्षित भागात जावे
क्षेपणास्त्र हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यावर भारत सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वर्तमान स्थिती आणि स्थानिक सुरक्षा सल्ला पाहता इस्रायलमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी विशेषकरून उत्तर आणि दक्षिण सीमेला लागून असलेल्या क्षेत्रांमध्ये काम करत असलेल्या भारतीयांनी सुरक्षित क्षेत्रांमध्ये जावे असे दूतावासाकडून म्हटले गेले आहे. सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे सांगत दूतावासाने आपत्कालीन संपर्क क्रमांकही जारी केला आहे.