इलेक्ट्रिक कार बाजारात उतरणार चीन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’ योजनेवर भर दिला आहे. या योजनेमध्ये मोदी सरकार काही प्रमाणात यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. मात्र, या मेक इन इंडिया योजनेत भारतीय कंपन्यांचा वाटा फारच कमी असून, खासकरून स्मार्टफोन उत्पादन क्षेत्रात याचे परिणाम दिसून येतात. भारतीय स्मार्टफोन उत्पादनात शाओमी, ओप्पो, वन प्लस, रियलमी सारख्या दिग्गज कंपन्यांचा दबदबा कायम आहे. यात भारतीय कंपन्यांचा वाटा काहीच नसल्यासारखे आहे.
भारतात 70 टक्के स्मार्टफोन बाजारपेठेवर चीनी कंपन्यांचा ताबा आहे. जो वर्षभरापूर्वी 60 टक्के होता, असे हाँगकाँगच्या काऊंटर पॉईंट अहवालावरून सांगण्यात आले आहे. स्मार्टफोननंतर आता भारतातील इलेक्ट्रिक कार व्यवसायातही चीन वेगाने पाऊले उचलत आहे. असा अंदाज आहे की, 2023 पर्यंत भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठ 2 अब्ज डॉलरची (1,42,78 कोटी रुपये) असणार आहे.
चीनी कंपन्यांचे यशस्वी धोरण
चीनी फर्म एसएआयसीने भारतात हेक्टर एसयूव्हीची विक्रमी विक्री केली होती. दरम्यान, एमजी मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कार एमजी जेडएस ईव्हीला भारतात सादर केले आहे. याची किंमत 20 लाखाच्या आसपास आहे. चीनची लिडिंग ईव्ही निर्माता कंपनी सनराने भारतात आपला प्रकल्प आणण्याचा निर्णय घेतला आहे. तर चीनची मोठी कार निर्माता कंपनी ग्रेट वॉल मोटर्स भारतीय वाहन क्षेत्रात 7 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.