For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरसीयूच्या डिजिलॉकरमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याला ‘लॉक’

06:04 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरसीयूच्या डिजिलॉकरमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याला ‘लॉक’
Advertisement

प्रमाणपत्र ग्राह्या धरण्यास कंपन्यांचा नकार : विद्यार्थ्यांचे विद्यापीठात हेलपाटे : विद्यापीठानेच प्रमाणपत्रे देणे गरजेचे

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

नेहमीच गलथान कारभारामुळे चर्चेत असणाऱ्या राणी चन्नम्मा विद्यापीठामुळे (आरसीयू) अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 2022 पासून आरसीयूने गुणपत्रिका कॉलेजमधून देण्याऐवजी डिजिलॉकर या अॅप्लिकेशनद्वारे देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, अनेक कंपन्या डिजिलॉकरद्वारे दिलेली गुणपत्रिका ग्राह्या धरत नसल्याने विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. इतर विद्यापीठांमध्ये डिजिलॉकरची सक्ती नसतानाही केवळ आरसीयूमध्येच हा प्रकार सुरू आहे.

Advertisement

वेळेत परीक्षा न घेणे, निकाल उशिराने लावणे, निकालांमध्ये अक्षम्य चुका हे आरसीयू विद्यापीठामध्ये नेहमीच घडत असते. परंतु, आता यामध्ये नव्याने तांत्रिक चुका पुढे येत आहेत. बी.कॉम, बीएस्सी, बीए, एमए, एमस्सी, एम.कॉम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आरसीयूने गुणपत्रिका कॉलेजमध्ये उपलब्ध करून देणे गरजेचे असते. परंतु, आरसीयूकडून डिजिलॉकर या अॅप्लिकेशनमध्ये गुणपत्रिका देण्यात येत आहेत. सरकारने डिजिलॉकरला मान्यता दिली असली तरी काही कंपन्या ती प्रमाणपत्रे स्वीकारण्यास तयार नाहीत.

डिजिलॉकरद्वारे गुणपत्रिकेची प्रत काढल्यास त्यावर डिजिलॉकर असा उल्लेख येत असल्याने हे मूळ प्रमाणपत्र नाही, असे समजून ग्राह्या धरले जात नाही. किमान ज्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राची गरज आहे, त्यांना विद्यापीठाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु, मागील महिनाभरापासून हेलपाटे मारणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रमाणपत्र देण्यात आलेली नाहीत. यामुळे चांगल्या पगाराच्या नोकरीपासून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांअभावी दूर रहावे लागत आहे.

विद्यार्थ्यांकडून पैशांची लूट

डिजिलॉकरद्वारे गुणपत्रिका ग्राह्या धरण्यात न आल्याने काही विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकांची डिजिलॉकरद्वारे येणारी प्रिंट काढून त्यावर विद्यापीठाचा सही-शिक्का घेतला. यासाठी विद्यापीठाने तब्बल 2 हजार 80 रुपये विद्यार्थ्यांकडून घेतले. परंतु, सही-शिक्का असूनही कंपन्यांकडून ग्राह्या धरले जात नसल्याने हे पैसे वाया गेले आहेत. पदवीदानासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 1200 रुपये घेतले जातात. मग प्रमाणपत्र देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.

Advertisement
Tags :

.