आयफोन विक्रीने ऍपलचा तिमाही नफा तेजीत
विक्रमी नोंद करत 1.58 लाख कोटी रुपयाचा लाभ
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
जगप्रसिद्ध आयफोन निर्मिती करणारी कंपनी ऍपल मागील काही तिमाहीमध्ये काही प्रमाणात नुकसानीचा प्रवास करावा लागला आहे. परंतु डिसेंबर तिमाहीत मात्र कंपनीला आयफोनच्या विक्रीमुळे मोठा नफा गाठण्यास यश मिळाल्याचे पहावयास मिळाले आहे.
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ऍपलचा नफा 11.4 टक्क्यांनी वाढून 22.2 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचला आहे. (1.58 लाख कोटी रुपये) अमेरिकन कंपनीचा आतापर्यंतचा तिमाहीतील सर्वाधिक नफा असल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या चार तिमाहीनंतर फ्लॅगशिप उत्पादनातील आयफोनची विक्री वाढल्यामुळे हा नफा मिळाला असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ऍपलचा सर्वाधिक महसूल हा आयफोनमधून मिळत असतो.
आयफोन विक्रीची तेजी
डिसेंबर तिमाहीत आयफोनची विक्री 8 टक्क्यांनी वाढून 56 अब्ज डॉलरवर राहिली आहे. (3.99 लाख कोटी रुपये) ऍपलचा एकूण महसूल 2018च्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत मागील तिमाहीत 9 टक्क्यांनी वाढून 91.8 अब्ज डॉलरवर स्थिरावला होता.(6.54 लाख कोटी रुपये) हा आतापर्यंतचा नवा विक्रम असून एकूण महसूलात आयफोनचे समभाग 61 टक्क्यांवर राहिले असल्याची माहिती कंपनी दिली आहे.
ऍपलच्या तेजीमध्ये भारताचा वाटा
ऍपल भारतामध्ये आयफोन एक्सआरचे लवकरच उत्पादन सुरु करणार आहे. चालू वर्षातील मध्यापर्यंत हे उत्पादन सादर करण्याची योजना आहे. ऍपलने वेगवेगळय़ा देशांमध्ये विक्रीचे आकडे सादर केले नाहीत, परंतु सीईओ टिम कुक यांच्या माहितीनुसार ब्राझील, चीन, भारत, थायलँड आणि तुर्की या बाजारांमधून कंपनी मोठा प्रतिसाद असल्याचे सांगितले आहे.