आयपॅडच्या विक्रीमध्ये वाढ
कोरोना काळात वाढती मागणी, ऍपल कंपनीची विक्रीत आघाडी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
घरातून काम आणि घरातूनच अभ्यास या सध्याच्या प्रणालीमुळे आयपॅड, मोबाईल, कॉम्प्युटर बनवणाऱया कंपन्यांनी सदरच्या उत्पादनांना वाढती मागणी लक्षात घेऊन लाभ उठविण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या काळामध्ये आयपॅडच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यात ऍपल कंपनीने आघाडी घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
2014 नंतर आयपॅडच्या विक्रीतून कंपन्यांना चांगले उत्पन्न कमावता आले आहे. कोरोना महामारीच्या कारणास्तव लोकांच्या जीवनशैलीमध्ये मोठा बदल झाला आहे. हा बदलच आयपॅडच्या विक्रीमध्ये वाढ करण्यास कारणीभूत ठरला आहे. हीच बाब लक्षात घेऊन ऍपल कंपनीने आपला नवा आयपॅड येत्या एप्रिलमध्ये सादर करणार असल्याचे सांगितले आहे. नव्या आयपॅड मॉडेलमध्ये प्रोसेसर आणि कॅमेऱयाची क्षमता वाढवून मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते. आताच्या आयपॅडप्रमाणेच सदरचे आयपॅड असणार असून 11 इंच ते 12.9 इंचची स्क्रीन त्याला असणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये मिनी एलईडी स्क्रीनही आणण्याची योजना कंपनी बनवत आहे. त्यामुळे ब्राईटनेस वाढून कॉन्ट्रास्ट प्रमाणातही सुधारणा होणार असल्याचे सांगितले जाते.
हलका आयपॅड लवकरच
येणाऱया काळात ऍपल कंपनी कॉलेजच्या मुलांसाठी वापरता यावा असा हलका पातळ व स्वस्त आयपॅड आणणार असल्याचे सांगितले जात आहे. याचप्रमाणे आयपॅड मिनीही कंपनी आणणार आहे, असे कळते.
ऍपलला 840 कोटीचे उत्पन्न
ऑक्टोबर-डिसेंबर 2020 मध्ये आयपॅडच्या माध्यमातून ऍपलला 840 कोटी डॉलर्सचे उत्पन्न प्राप्त करता आले आहे. 2014 नंतरच्या काळात पाहिल्यास वरील उत्पन्न सर्वाधिक आहे. कोरोना काळात घरातून ऑफिसचे काम व मुलांचा अभ्यासही घरातून होत असल्याने अनेकांनी आयपॅड खरेदी केला. दरम्यानच्या काळात आयपॅडला एकदम मागणी वाढल्याचे दिसून आले. याचा फायदा या क्षेत्रात असणाऱया कंपन्यांना उठवता आला.