आमदार पुत्राजवळ सापडले 8 कोटी
लाच घेताना सापडले लोकायुक्त जाळ्यात : 5 जणांना अटक : 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
प्रतिनिधी/ बेंगळूर
लोकायुक्त जाळ्यात अडकलेले दावणगेरे जिह्यातील चेन्नगिरीचे भाजप आमदार माडाळ वीरुपाक्षप्पा यांचे पुत्र माडाळ प्रशांत यांच्या निवासस्थानी सापडलेली रोकड पाहून लोकायुक्त अधिकायांना धक्काच बसला आहे. गुरुवारी प्रशांत यांना कंत्राटदाराकडून 40 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. शनिवारी देखील प्रशांत यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. सलग 18 तास झालेल्या तपासणीवेळी तब्बल 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम आढळून आली आहे. सदर रक्कम लोकायुक्त अधिकायांनी जप्त केले आहे. याप्रकरणी प्रशांत यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. प्रशांत हे केएएस अधिकारी असून बेंगळूर जल मंडळाचे (बीडब्ल्यूएसएसबी) मुख्य लेखाधिकारी आहेत.
कर्नाटक सोप अँड डिटर्जंट कारखान्याला (केएसडीएल) केमिकल पुरवठा करण्याचे टेंडर देण्याकरिता 80 लाख रुपयांची लाच माडाळ प्रशांत यांनी मागितल्याचा आरोप आहे. गुरुवारी या रकमेपैकी कंत्राटदाराकडून 40 लाख रुपये स्वीकारत असताना लोकायुक्त अधिकायांनी प्रशांत यांना रंगेहात पकडले. रात्री बेंगळूरमधील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. यावेळी 1 कोटी 62 लाख रुपये जप्त करण्यात आले. शुक्रवारी सकाळी प्रशांत यांच्या बेंगळूरच्या संजयनगरमधील के एम व्ही मेंशन अपार्टमेंटमधील निवासस्थानावरही छापा टाकून लोकायुक्त अधिकायांनी झडती घेतली. यावेळी 7 कोटी 62 लाख जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी प्रशांत तसेच त्यांचे नातेवाईक सिद्धेश अकाउंटंट सुरेंद्र, निकोलस आणि गंगाधर यांना अटक करण्यात आली आहे.त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, आमदार वीरूपाक्षप्पा यांच्या निवासस्थानी देखील लोकायुक्त अधिकायांनी छापा टाकून तपासणी केली आहे.
सलग 18 तास केलेल्या तपासणीवेळी लोकायुक्त अधिकायांनी प्रशांत यांच्या व्यवहाराशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि संगणकामधील डाटा पेन ड्राईव्हमध्ये जमा केला आहे.
केएसडीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश यांच्या निवासस्थानी देखील लोकायुक्त पथकाने धाड टाकली आहे. महेश यांच्या बेंगळूरमधील बसवनगुडी येथील निवासस्थानी तपासणी करण्यात आली. मात्र तेथे कोणतीही रक्कम आढळून आली नाही.
.
आमदार वीरुपाक्षप्पा यांचा केएसडीएलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
आपल्या पुत्राला लाच प्रकरणी लोकायुक्त अधिकायांनी अटक केल्यानंतर आमदार माडाळ वीरुपाक्षप्पा हे अडचणीत आले आहेत. शुक्रवारी त्यांनी कर्नाटक सोप अँड डिटर्जंट निगमच्या (केएसडीएल) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले राजीनामापत्र मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे पाठवून दिले आहे. आपल्या मुलावर पडलेल्या लोकायुक्त छाप्याशी आपला कोणताही संबंध नाही. हे आपल्या आणि आपल्या कुटुंबाविरुद्ध षडयंत्र आहे. त्यामुळे आपल्यावर आरोप झाल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून मी केएसडीएलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती विरूपाक्षप्पा यांनी केली आहे.
निःपक्षपातीपणे तपास करणार : बोम्माई
आमदार माडाळ वीरुपाक्षप्पा यांचे पुत्र प्रशांत यांच्यावरील आरोपासंबंधी निःपक्षपातीपणे तपास करण्यात येईल. चुका केलेल्यांना शिक्षा व्हावी, अशी आपली भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. शुक्रवारी बेंगळूरमधील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठीच लोकायुक्त संस्थेची पुनर्रस्थापना करण्यात आली आहे. लोकायुक्त संस्थेशिवाय अशी अनेक प्रकरणे काँग्रेसची सत्ता असलेल्या काळात दडपली गेली आहेत. माडाळ प्रशांत यांच्या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी होणार आहे. तपास करण्यास लोकायुक्त संस्था स्वतंत्र आहे. छाप्यावेळी आढळून आलेली रक्कम कोठून आली? ती रक्कम कोणाची?, याविषयी सत्य समोर यावे हा आपला हेतू आहे, असे असे मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.