आप नेते सत्येंद्र जैन तुरुंगातच राहणार
मनी लाँड्रिंग प्रकरणी जामीन नाकारला, सीबीआय न्यायालयाने याचिका फेटाळली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या तिहार कारागृहात असलेले आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना सीबीआय न्यायालयाचा आणखी एक धक्का बसला आहे. गुरुवारी न्यायालयाने सत्येंद्र जैन आणि इतर दोघांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन देण्यास नकार दिला. यापूर्वी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विकास धुल यांनी निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने मुख्य खटल्याच्या सुनावणीसाठी 29 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग प्रकरणात (पीएमएलए) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. तेव्हापासून ते तिहार तुरुंगात आहेत. मनी लाँड्रिंगसाठी वापरल्या जाणाऱया 4 बनावट कंपन्यांवर सत्येंद्र जैन यांचे प्रत्यक्ष नियंत्रण होते. तसेच सहआरोपी अंकुश जैन आणि वैभव जैन हे फक्त डमी होते, असा दावा ईडीकडून करण्यात आला होता. दुसरीकडे, सत्येंद्र जैन यांची भूमिका पीएमएलएच्या कक्षेत येत नसल्याचे म्हणणे त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना मांडले होते. जैन यांच्याबाबतचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जैन यांच्यावर मनी लाँड्रिंगचा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. 2010 मध्ये मनी लाँड्रिंगचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यावेळी जैन हे ना आमदार होते ना मंत्री. अशा परिस्थितीत ते मनी लाँड्रिंगचा कट कसा रचू शकतात? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. जैन यांना यापुढे कोठडीत ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नाही, असे सांगत जैन यांनी जामीन मंजूर करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. मात्र, न्यायालयाने अद्याप जामीन मंजूर न केल्याने त्यांना दिलासा मिळू शकलेला नाही.
कुटुंबीयही अडचणीत
सीबीआयने सत्येंद्र जैन यांच्या पत्नी आणि इतर कुटुंबीयांवरही लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप लावले होते. जैन यांच्यावर दिल्लीत अनेक बनावट कंपन्या सुरू केल्याचा किंवा खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यांनी कोलकातास्थित तीन हवाला ऑपरेटर्सच्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 16.39 कोटी रुपयांचा काळा पैसाही लाँडर केला. प्रयास, इंडो आणि अकिंचन नावाच्या कंपन्यांमध्ये जैन यांचे मोठय़ा प्रमाणात शेअर्स होते. 2015 मध्ये केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर जैन यांचे सर्व शेअर्स त्यांच्या पत्नीच्या नावे झाले. अटकेनंतर ईडीने जैन यांची मनी लाँड्रिंगची कागदपत्रे दाखवून चौकशी केली असता, त्यांनी कोरोनामुळे स्मरणशक्ती गमावल्याचा दावा केला होता.