आदर्श गणेश मंडळाची शतकोत्तर परंपरा
कचेरी गल्ली, शहापूर मंडळाचा 101 वर्षांचा सोहळा : आर्थिक बाबींचे काटेकोर नियोजन
बेळगाव : समाज एकत्रित यावा, या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया रोवला. परंतु आज गणेशोत्सवाला एक कॉर्पोरेट स्वरुप देण्याचा प्रयत्न काही मंडळांकडून सुरू असताना मागील 100 वर्षांपासून कोणताही गाजावाजा न करता, ना वर्गणी, ना भलीमोठी गणेशमूर्ती, ना डीजेचा दणदणाट अशा साध्या पण उत्कट भक्तिभावाने कचेरी गल्ली, शहापूर येथील मंडळ गणेशोत्सव साजरा करीत आहे. या मंडळाने इतर मंडळांसमोर नेहमीच आदर्श ठेवला असून यावर्षी या मंडळाचे 101 वे वर्षे असल्याने मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शहापूर परिसरातील शतक पूर्ण करणारे हे दुसरे गणेशोत्सव मंडळ आहे. मागील वर्षी खडेबाजार, शहापूर येथील मंडळाने शतकोत्सव सोहळा साजरा केला होता. कचेरी गल्लीत अधिकाधिक ब्राह्मण कुटुंबे असल्याने लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून सार्वजनिक गणशोत्सव सुरू करण्यात आला. 1923 साली पहिल्यांदा गल्लीतील गणपती मंदिरात लहान गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. 1971 मध्ये गणेशोत्सवाला व्यापक स्वरुप मिळाले. त्यानंतर मंडप घालून गणेशोत्सव साजरा होऊ लागला.
गणेश मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या पिंपळकट्ट्यानजीक नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. त्यावेळी गल्लीतील युवक स्वत:च मंडप घालण्याचे काम करीत असत. अत्यंत साध्या पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता गणेशोत्सव साजरा करण्यात येत होता. आजही नवी पिढी अवाजवी खर्च टाळून गणरायाची आराधना करते. मागील 100 वर्षांपासून मंडळाने आर्थिक बाबींचे काटेकोर नियोजन केले आहे. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते आजही मंडळाच्या पैशातून एक चहादेखील पित नाहीत, ही मंडळाची खासियत आहे. विशेष म्हणजे लिलावादिवशीच जमा-खर्च सादर करण्यात येतो. आज गल्लीत इतर समाजाचीही घरे असून सर्वजण एकदिलाने उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असतात.
आज आगमन सोहळा
कचेरी गल्ली गणेशोत्सव मंडळाची शताब्दी मागील वर्षी झाली. परंतु सर्वच मंडळे शतकोत्सव साजरी करताना त्याऐवजी 101 व्या वर्षाचा मोठा सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यावर्षी भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दि. 4 रोजी गणेशमूर्तीचा आगमन सोहळा होणार असून गणेशोत्सव काळात 85 हून अधिक वय असलेल्या गल्लीतील नागरिकांचा सत्कार, रक्तदान शिबिर, गणहोम, महाप्रसाद, मुलांसाठी विविध स्पर्धा व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
वर्गणी न काढता साजरा होतो ‘गणेशोत्सव’
सध्या गणेशोत्सव भव्यदिव्य करण्यासाठी काही मंडळे नागरिकांकडून वर्गणी गोळा करतात. इतकीच वर्गणी हवी म्हणून वादावादीही होते. परंतु शहापूरच्या कचेरी गल्ली मंडळाने मागील 45 वर्षांपासून वर्गणी जमा केलेली नाही. गणेशभक्तांनी स्वखुशीने दिलेली देणगी व लिलाव तसेच मंडळाने ठेवलेल्या ठेवींच्या व्याजातून गणेशोत्सव साजरा करण्याचा चांगला पायंडा या मंडळाने घातला आहे. यावर्षी मोठा उत्सव साजरा करण्यात येत असल्याने वर्गणी जमा करावी लागली असली तरी पुढील वर्षीपासून वर्गणी जमा केली जाणार नसल्याने मंडळाने स्पष्ट केले आहे.
50 वर्षांपासून मंडळात कार्यरत
आमच्या कचेरी गल्ली गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपद 15 वर्षांपासून सांभाळत असलो तरी मागील 50 वर्षांपासून मंडळात कार्यरत आहे. अवाजवी खर्च टाळून ध्येय-धोरणाने मंडळ चालविले जाते. त्यामुळे वर्गणी न काढता गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी गणेशोत्सवाला 101 वर्षे झाल्याबद्दल अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
- मिलिंद बापट (अध्यक्ष)