आणखी किती दिवस धोका पत्करायचा?
पंतप्रधान मोदींचा सवाल ः नौदलाच्या कार्यक्रमात संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनावर भर देत पंतप्रधानांनी जगातील इतर देशांकडे जी शस्त्रे आहेत, तीच शस्त्रे वापरण्याची जोखीम आपण किती काळ पत्करणार? असा प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी भारतीय नौदलाच्या ‘एनआयआयओ’तर्फे (नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन) आयोजित ‘स्वावलंबन’ कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी त्यांनी एकविसाव्या शतकातील भारतासाठी भारतीय सैन्यात स्वावलंबनाचे ध्येय अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वावलंबी नौदलासाठी प्रथम स्वावलंबी चर्चासत्र आयोजित करणे हे या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मी माझ्या जवानांना ती शस्त्रे का देऊ, जी इतर देशांचे सैनिकही वापरत आहेत. आपल्या जवानांकडे अशी शस्त्रे असतील, ज्याची शत्रूने कल्पनाही केली नसेल. हल्ल्याची चुणूक लागण्यापूर्वी आपल्या जवानांनी त्यांना संपवले पाहिजे. अशी ताकद आपल्या जवानांच्या मनगटात आल्यास भारत कुठेही कमी पडणार नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्यापूर्वी भारताचे संरक्षण क्षेत्र खूप मजबूत होते. स्वातंत्र्याच्या वेळी देशात 18 आयुध कारखाने होते. सैन्यासाठी अनेक प्रकारची शस्त्रे येथे बनवली जात होती. दुसऱया महायुद्धात आम्ही संरक्षण उपकरणांचा एक महत्त्वाचा पुरवठादार होतो. पण आता सर्वात मोठे आयातदार झालो आहोत, असे सांगत लष्करासाठी 75 स्वदेशी तंत्रज्ञानाची निर्मिती हे एक प्रकारे पहिले पाऊल आहे. त्यांची संख्या सतत वाढवण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करण्यापूर्वी नौदलाची ताकद अभूतपूर्व उंचीवर नेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हायला हवी, असे मार्गदर्शन पंतप्रधानांनी उपस्थित अधिकाऱयांना केले.
गेल्या दशकांच्या दृष्टिकोनातून शिकून, आज आपण एक नवीन संरक्षण पर्यावरणीय प्रणाली विकसित करत आहोत. आज संरक्षण संशोधन आणि विकास संस्था खाजगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था, एमएसएमई आणि स्टार्ट-अपसाठी खुली करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण कंपन्यांना विविध क्षेत्रात संघटित करून आम्ही त्यांना नवे बळ दिले आहे. गेल्या 8 वर्षांत आम्ही केवळ संरक्षण क्षेत्राचे बजेटच वाढवले नाहीतर हे बजेट देशामध्येच संरक्षण उत्पादन आणि पर्यावरणीय प्रणालींच्या विकासासाठी उपयुक्त आहे याचीही खात्री केली असल्याचे ते पुढे म्हणाले.