आजपासून नवा अर्थसंकल्प लागू
आर्थिक व्यवहारांमध्ये होणार अनेक परिवर्तने
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेने संमत केलेला 2022-2023 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज शुक्रवारपासून लागू होत आहे. या अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींचा परिणाम आपल्या आर्थिक व्यवहारांवर होणार आहे. दीर्घकालीन भांडवली उत्पन्न कराचे स्वरुप, राष्ट्रीय निवृत्तीवेतन गुंतवणूक, खातेदार ओळख नियम (केवायसी), ईपीएफ खात्यावर कर इत्यादी परिवर्तने होणार आहेत.
स्थावर मालमत्ता विक्रीवर द्याव्या लागणाऱया टीडीएससंबंधी नवे नियम लागू होणार आहेत. तसेच आभासी चलनाच्या व्यवहारांवर (क्रिप्टो करन्सी) कर बसविण्यात आला आहे. तोही आजपासून लागू होत आहे. आपल्या प्राप्तिकर विवरणपत्रात काही चूक असल्यास ती सुधारण्यासाठी सुधारित विवरणपत्र सादर करण्याची संधीही मिळणार आहे. तसेच 75 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱया ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्यापासून मुक्तता मिळणार आहे. प्रधानमंत्री वयवंदन योजनेचा नवा व्याजदरही लागू होणार आहे. गृहकर्जावर मिळणारी अतिरिक्त सूटही आता काढून घेण्यात आली आहे. जनतेचे हित आणि आर्थिक सुविधा लक्षात घेऊन नव्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केले होते. संसदेत अर्थसंकल्पावर चर्चा होत असताना या तरतुदींचा उहापोह करण्यात आला होता. आता अर्थसंकल्पाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमती दिल्याने तो या आर्थिक वर्षासाठी लागू होणार आहे.