आंध्र प्रदेश, तेलंगणा : कूस बदलणार?
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दक्षिण भारतातील महत्वाच्या 2 राज्यांमध्ये चौथ्या टप्प्यात, अर्थात 13 मे या दिवशी मतदान होणार आहे. आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीसमवेत विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. या राज्यात लोकसभेच्या 25 जागा असून तेलंगणात 17 जागा आहेत. 2013 पर्यंत तेलंगणा आंध्र प्रदेशचाच भाग होता. तथापि 2014 च्या निवडणुकीआधी तत्कालीन काँग्रेसप्रणित केंद्र सरकारने वेगळ्या तेलंगणा राज्याची किमान 50 वर्षे होत असलेली मागणी अचानकपणे मान्य करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेलंगणा हे नवे राज्य जन्माला आले. मात्र, ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आदी राज्यांचे विभाजन शांततेत आणि सुरळीत पार पडले होते, असे आंध्रच्या विभाजनाच्या संबंधात झाले नाही. या विभाजनामुळे उरलेल्या आंध्र प्रदेशात मोठी नाराजी निर्माण झाली आणि तेलंगणातही नव्या राज्याच्या राजधानीवरुन वाद पेटला. दोन्ही राज्यांमधून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीवाटपाचा प्रश्न, राज्याच्या संपत्तीचे विभाजन आणि राजधानीचा प्रश्न अशा अनेक समस्या त्वरित उभ्या राहिल्या. त्यांचे निराकरण लवकर होणार नव्हते. परिणामी, वेगळ्या तेलंगणाची मागणी मान्य झाल्याने या राज्यात तरी काँग्रेसला लाभ मिळेल, अशी त्या पक्षाची जी अपेक्षा होती, ती फोल ठरली आणि दोन्ही राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला जबर फटका बसला. आता या विभाजनाला 10 वर्षे होऊन गेली आहेत. दोन्ही राज्यांमधील सध्याच्या परिस्थितीचा हा आढावा...
आंध्र प्रदेश : उसळती राजकीय संस्कृती
- पार्श्वभूमी
ड भाषेच्या आधारावर निर्माण झालेले हे भारतातील प्रथम राज्य आहे. पोट्टी श्रीरामलू यांच्या आमरण उपोषणामुळे केंद्रातील त्यावेळच्या नेहरु सरकारला या राज्याची भाषेच्या आधारावर निर्मिती करावी लागली. त्यासाठी आंध्रच्या जनतेने प्रचंड आणि हिंसक आंदोलन केले होते. या आंदोलनाचाच भाग म्हणून पोट्टी श्रीरामलू यांनी उपोषण केले होते. या आंदोलनाचे लोण नंतर जवळच्या राज्यांमध्येही पसरले आणि भाषेच्या आधारावरील अनेक राज्ये जन्माला आली.
ड उत्तर तामिळनाडूचे काही जिल्हे आणि पूर्वीच्या निजामाचे हैद्राबाद संस्थान, तसेच बंगालच्या उपसागराच्या तटानजीकचा भाग अशा भूप्रदेशाला आंध्र प्रदेशमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, तटीय आंधप्रदेश आणि हैद्राबाद संस्थानातील जनता यांच्या संस्कृतीत मोठे भिन्नत्व होते. त्यामुळे आंध्र प्रदेशची निर्मिती झाल्यानंतर काही वर्षांमध्ये तेलंगणा राज्याच्या निर्मितीची मागणी होऊ लागली. ती बरीच दशके दाबून ठेवण्यात त्यावेळच्या केंद्र सरकारांना यश आले होते.
ड आंध्र प्रदेशातही इतर राज्यांप्रमाणे काँग्रेसचाच प्रभाव प्रारंभीची अनेक वर्षे होता. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये याचे प्रतिबिंब दिसत होते. 1977 मध्ये उत्तर भारतात सर्वत्र काँग्रेसचा पराभव होत असताना आंध्र प्रदेशने मात्र, काँग्रेसच्या पारड्यात 42 पैकी 40 जागा घातल्या होत्या. मात्र, 1983 मध्ये नुकत्याच जन्माला आलेल्या तेलगु देशम या पक्षाने काँग्रेसचे वर्चस्व संपवले. नंतरच्या काळात या राज्यात याच दोन पक्षांमध्ये राजकीय स्पर्धा होत होती.
ड तेलगु देशम नव्या पक्षाप्रमाणे नंतर वायएसआर काँग्रेस नावाचा पक्षही जन्माला आला. काँग्रेसचे बडे नेते वाय. एस. राजशेखर रे•ाr यांचे पुत्र जगनमोहन रे•ाr यांनी काँग्रेसमधून फुटून हा पक्ष स्थापन केला होता. राजशेखर रे•ाr यांच्या अपघाती मृत्यूनंतर काँग्रेसने त्यांच्या पुत्राला गैरमार्गाने संपत्ती मिळविण्याच्या आरोपाखाली कारावासात टाकले. त्यामुळे नंतर जगनमोहन रे•ाr हे काँग्रेसचे हाडवैरी बनले. त्यामुळे राजकारणात तिसऱ्या प्रबळ पक्षाची भर पडली.
- विभाजनानंतर...
ड 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या विभाजनानंतर मूळच्या आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा राहिल्या. विभाजनानंतरच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेस या पक्षाला लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळाले. विधानसभेत बहुमत मिळाल्याने जगनमोहन रे•ाr मुख्यमंत्री झाले. काँग्रेस, तेलगु देशम यांचा पराभव झाला.
ड त्याचवेळी केंद्रातही सत्तांतर घडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही केंद्रात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार निवडले गेले. तसेच आंध्र प्रदेशातही जगनमोहन रे•ाr यांना पुन्हा मोठे बहुमत मिळाले. राज्यात भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असतानाही रे•ाr यांनी केंद्राशी सहकार्य केले आहे.
- सध्याची परिस्थिती
ड 2014 च्या निवडणुकीआधी बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तेलगु देशम पक्ष, जो 2019 च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षापासून दूर गेला होता, तो पुन्हा युतीत आला आहे. तसेच, जगनमोहन रे•ाr आणि त्यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला यांच्यात वितुष्ट आल्याने त्या काँग्रेसमध्ये गेल्या आहेत.
ड आता या राज्यात त्रिकोणी लढत होत आहे. वायएसआर काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि तेलगु देशम यांची युती आणि काँग्रेस, अशा तिहेरी लढतीत या राज्याचा मतदान नेमके काय करणार, यासंबंधी अनेक उलटसुलट मते व्यक्त केली जात आहेत. विश्लेषकांच्या मते यंदा रे•ाr यांना विजय सहजसाध्य दिसत नाही.
ड तेलंगणात काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविले. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्येही काँग्रेसमध्ये उत्साह दिसून येतो. तर तेलगु देशम पक्षाही जोमाने कामाला लागला आहे. युतीमध्ये हा पक्ष 17 जागांवर स्पर्धेत असून भारतीय जनता पक्षाला 6 जागा तर पवनकल्याण जनसेना पक्षाला 2 जागा आहेत.
- यंदा काय होऊ शकेल...
ड त्रिकोणी लढत असल्याने ती चुरशीची होण्याची शक्यता आहे. तीन्ही राजकीय शक्ती जीव तोडून प्रयत्न करताना दिसतात. मात्र, अंतिमत: वायएसआर काँग्रेस बाजी मारेल. पण मागच्या इतके मोठे यश मिळणार नाही, असे अनुमान काही मतदानपूर्व चाचण्यांमधून काढण्यात आले आहे. तर अन्य काही सर्वेक्षणांमध्ये तेलगु देशम, भारतीय जनता पक्ष आणि जनसेना यांच्या युतीला मोठे यश मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या राज्यातील परिस्थिती यावेळी प्रवाही असून नेमके काय होणार हे सांगता येत नाही. वायएसआर काँग्रेसच्या 10 वर्षांच्या सत्तेनंतर हे राज्य कूस बदलणार का हा प्रश्न विश्लेषकांना पडला आहे.
तेलंगणा : टीआरएस ते काँग्रेस
- पार्श्वभूमी
हे राज्य 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जन्माला आले. वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी मोठे आणि प्रदीर्घ आंदोलन के. चंद्रशेखर राव यांनी उभे केले होते. त्यासाठी तेलंगणा राष्ट्र समिती स्थापन करण्यात आली होती. पुढे तिचे राजकीय पक्षात रुपांतर झाले आणि या पक्षाने तेलंगणातील प्रथम लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळविले होते.
ड 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत मात्र भारतीय जनता पक्षाने चार जागा जिंकून आपले सामर्थ्य वाढल्याचे दाखवून दिले. चंद्रशेखर राव यांनी या लोकसभा निवडणुकीच्या आधीच विधानसभा भंग करुन विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेतली आणि 119 पैकी 82 जागा मिळवित पुन्हा सत्ता स्थापन केली होती. वेळेपूर्वी विधानसभा निवडणूक घेण्याचा त्यांचा डाव यशस्वी ठरला होता.
ड मात्र, 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना पराभूत केले आहे. त्यापूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती हे पक्षाचे नाव बदलून राव यांनी ते भारत राष्ट्र समिती असे केले आहे. राष्ट्रीय पातळीवर निवडणुकीच्या स्पर्धेत उतरण्याचा त्यांनी प्रयत्न काही काळ केला. पण तो विफल ठरल्याचे दिसून येत आहे, कारण विधानसभा निवडणुकीतच त्यांना मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागले आहे.
- सध्याची परिस्थिती
ड यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि भारत राष्ट्र समिती अशी तिहेरी लढत होत आहे. पण अनेक जाणकारांच्या मते भारत राष्ट्र समिती हा पक्ष काहीसा निस्तेज झाला आहे. त्यामुळे खरी स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातच आहे. काँग्रेसला या राज्याकडून जास्त आशा आणि अपेक्षा आहे. कारण विधानसभा निवडणूक नुकतीच तिने जिंकली आहे.
ड या राज्यात चौथा पक्ष एआयएमआयएम आहे. तो प्रामुख्याने हैद्राबाद या राजधानीच्या शहरापुरता मर्यादित आहे. हा मुस्लीम पक्ष म्हणून ओळखला जातो. हैद्राबादमधून नेहमी याच पक्षाचा उमेदवार आजवर निवडून आला आहे. यंदाही या पक्षाचे नेते असदुद्दिन ओवैसी या मतदारसंघात उमेदवार आहेत. हा पक्ष जुना असला तरी त्याचा राज्यात इतरत्र विस्तार झालेला नाही, असे दिसून येते.
ड गेल्या निवडणुकीत चार जागा जिंकल्याने भारतीय जनता पक्षही आपली कामगिरी अधिक सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पक्षाने यंदा या राज्यात ‘फोकस्ड अॅप्रोच’ वर भर दिला असून 17 पैकी 10 मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत चार प्रचार सभा घेतल्या असून मतदानापर्यंत त्यांचे आणखी दोन दौरे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- यावेळी काय घडू शकेल ?
ड आंध्र प्रदेशप्रमाणे या राज्यातही परिवर्तन घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आंध्र प्रदेशात मोठे परिवर्तन घडेलच अशी निश्चिती कोणत्याही जाणकाराने किंवा सर्वेक्षकाने दिलेली नाही. तथापि, तेलंगणात परिवर्तन निश्चित घडणार आणि गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये वर्चस्व गाजवलेला चंद्रशेखर राव यांचा पक्ष यावेळी तिसऱ्या क्रमांकावर जाईल, अशी शक्यता दाट दिसून येत आहे. त्यामुळे प्रथम क्रमांकावर काँग्रेस आणि द्वितीय क्रमांकावर भारतीय जनता पक्ष राहील असे अनुमान बव्हंशी राजकीय अभ्यासकांनी काढले आहे. परिणामी, हे राज्य यावेळी कूस बदलणार, हे निश्चित मानले जात आहे. तथापि, अनुमाने खरी ठरतील का, हे निर्धारित होण्यासाठी सर्वांना 4 जूनची प्रतीक्षा करावी लागेल.