आंध्रप्रदेशमध्ये मंत्रिमंडळ फेरबदल
सर्व 24 मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे : सोमवारी नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार : सर्व जिल्हय़ांना संधी देण्याचा प्रयत्न
हैदराबाद / वृत्तसंस्था
आंध्रप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय नाटय़ घडले आहे. राज्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने म्हणजे सर्वच 24 मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे सोपवले. आता जगनमोहन रेड्डी आगामी निवडणूक नजरेसमोर ठेऊन नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेऊ शकतात. त्यानुसार यापूर्वीच्या काही मोजक्मयाच मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्मयता आहे. मंत्रिमंडळाला नवा चेहरा देताना प्रादेशिक समतोल राखला जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी बुधवारी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेऊन त्यांना मंत्रिमंडळातील प्रस्तावित फेरबदलाची कल्पना दिली. ते लवकरच पुन्हा एकदा राज्यपालांची भेट घेऊन नव्या मंत्र्यांची यादी सोपवतील. नव्या मंत्रिमंडळाचा 11 एप्रिलला शपथविधी होण्याचे संकेत सध्या मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांकडून मिळत आहेत. जगनमोहन रेड्डी सरकारने अलीकडेच जिल्हय़ांची संख्या दुप्पट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर आता मंत्रिमंडळ पुनर्रचना करत राजकीयदृष्टय़ा संतुलित वातावरण बनवण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. गुरुवारी झालेल्या दोन-अडीच तासाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी राजीनामे दिले. मंत्र्यांना जबाबदारी सोपवतानाच त्यांची नियुक्ती अडीच वर्षांसाठी होत असल्याची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे त्यांची कोणतीही नाराजी नाही. आता नव्या मंत्रिमंडळात राज्यातील सर्व 26 जिह्यांना प्रतिनिधित्व मिळण्याची शक्मयता आहे. त्यात सर्वच जाती, धर्म, क्षेत्र व महिलांना स्थान देऊन समतोल साधला जाऊ शकतो.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवल्यानंतर जगन रेड्डी यांनी आपला निम्मा कार्यकाळ संपल्यानंतर मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे विद्यमान मंत्रिमंडळाचा राजीनामा अपेक्षितच होता. हा फेरबदल गत डिसेंबर महिन्यातच होणार होता पण, कोरोनामुळे तो लांबणीवर पडला होता. यापूर्वी जगन रेड्डी यांनी एक संतुलित मंत्रिमंडळ स्थापन केले होते. त्यात अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, कापू व मुस्लीम समुदायातील 5 उपमुख्यमंत्री नियुक्त केले होते. कॅबिनेटमध्ये 3 महिला मंत्रीही होत्या.