अशोक लेलँडच्या विक्रीत 40 टक्क्यांची घसरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील दुसरी सर्वात मोठी व्यावसायिक वाहन निर्माता कंपनी अशोक लेलँडच्या विक्रीत जानेवारी महिन्यामध्ये 39.9 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने 11,850 यूनिटची विक्री केली आहे. व्यावसायिक वाहन विक्रीतून औद्योगिक वाढीच्या वेगाचा अंदाज लावला जातो. असे मानले जाते की, जर व्यावसायिक वाहन विक्री कमी आहे तर देशात आर्थिक मंदीचे सावट आहे.
अशोक लेलँडने आपल्या रेग्यूलेटरी फायलिंगच्या दरम्यान सांगितले की, गेल्या वर्षी कंपनीने 19,741 यूनिटची विक्री केली होती. जानेवारी महिन्याच्या दरम्यान देशांतर्गत सुमारे 10,850 यूनिटची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या दरम्यान 18,533 यूनिट इतकी होती, असे चेन्नई बेस्ड कंपनीने सांगितले. जर मध्यम आणि जड व्यावसायिक वाहन विभागाबद्दल बोलायचे झाले तर, देशांतर्गत बाजारात वाहन विक्री 49.1 टक्क्यांनी घसरत 6,949 यूनिटवर आली आहे. हा आकडा गेल्या वर्षीपर्यंत 13,663 यूनिट होता. तर हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री गेल्या महिन्यात 3,901 यूनिट होती, जी गेल्या वर्षीच्या जानेवारीत 4,870 यूनिट म्हणजे 19.8 टक्क्यांनी कमी आहे.