अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात
‘हलवा सेरेमनी’ने प्रारंभ : अर्थमंत्र्यासह अधिकारी, कर्मचाऱयांची उपस्थिती
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला दुसऱयांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्प दस्तावेजांच्या छपाईच्या कामाच्यापूर्वी ‘हलवा सेरेमनी’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांच्यासह अर्थ मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. हलवा सरेमनीनंतर आजपासून अर्थसंकल्प बनविण्याच्या कामाशी संबंधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱयांना अर्थसंकल्पाच्या सादरीकरणापर्यंत अर्थ मंत्रालयात राहावे लागणार आहे..
हलवा सेरेमनी ही एक अशी परंपरा आहे, जी बऱयाच काळापासून सुरू आहे. अर्थसंकल्पापूर्वी मोठय़ा कढईत हलवा तयार केला जातो आणि मंत्रालयातील सर्व कर्मचाऱयांना त्याचे वाटप केले जाते. या गोड पदार्थाच्या वाटपालाही एक विशेष महत्त्व आहे. मंत्रालयातील अधिकारी आणि साहाय्यक कर्मचारी मोठय़ा संख्येने या अर्थसंकल्पाच्या कामात गुंतलेले असतात त्यांना अर्थसंकल्प तयार करण्यापासून ते छपाई होऊन सादरीकरण होण्यापर्यंत आपल्या कुटुंबाच्या संपर्कात राहता येत नाही. तसेच कोणत्याही माध्यमांशी संपर्क साधता येत नाही. त्यांना एकप्रकारे नजरकैदमध्ये ठेवले जाते.