अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली
ईडी समन्सप्रकरणी आज न्यायालयासमोर हजर व्हावे लागणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू सत्र न्यायालयाकडून झटका बसला आहे. सत्र न्यायाधीश राकेश सायल यांनी ईडीच्या तक्रारीवरून न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवार, 16 मार्च रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (एसीएमएम) दिव्या मल्होत्रा यांच्या न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
मद्य धोरण प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविऊद्ध नोटीस बजावूनही ते हजर न राहिल्याने न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणात समन्स बजावत न्यायालयासमोर हजर होण्याचे निर्देश दिले होते. तरीही केजरीवाल यांनी वैयक्तिक हजेरीतून सूट मिळावी यासाठी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यांच्या याचिकेवर गुऊवारी आणि शुक्रवारी दीर्घ सुनावणी झाली. त्यानंतर विशेष न्यायाधीश राकेश सायल यांनी कारवाईवरील स्थगिती फेटाळली आहे. परंतु न्यायालयात हजर राहण्यापासून सूट हवी असेल तर ते सत्र न्यायालयात अपील करू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वतीने अधिवक्ता राजीव मोहन आणि ज्येष्ठ वकील रमेश गुप्ता यांनी शुक्रवारी युक्तिवाद केला.
केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयाचे समन्स
7 मार्च रोजी न्यायालयाने केजरीवाल यांना समन्स पाठवले होते. ईडीने आतापर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 8 समन्स बजावले आहेत. मात्र, केजरीवाल एकदाही एजन्सीसमोर हजर झाले नसल्यामुळे ईडीने केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयात दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांनी केजरीवाल यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.