अमर सिंह यांचे निधन
सिंगापूरमध्ये उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास
लखनौ / वृत्तसंस्था
समाजवादी पार्टीचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनसमयी त्यांचे वय 64 वर्षे होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडतच चालली होती.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शनिवारी दुपारनंतर ‘ज्येष्ठ संसदपटू अमर सिंह यांचे दुःखद निधन झाले आहे’ असे ट्विट करत त्यांच्या मृत्यूची वार्ता सोशल मीडियावर जारी केली. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या एका नेत्यानेही यासंबंधीच्या वृत्ताला दुजोरा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. अमर सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रमुख नेत्यांमध्ये अमर सिंह यांची गणना होत होती. जुलै 2016 मध्ये ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते. सर्वप्रथम 1996 मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेल्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. त्यानंतर 2002 आणि 2008 मध्येही ते राज्यसभेवर निवडून गेले होते. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते.
अमिताभ कुटंबियांशी निकटचे संबंध
अमर सिंह यांचे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांच्यासोबतच बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियांशी खूप जवळचे संबंध होते. गेल्या काही वर्षांत या नात्यात कटूता निर्माण झाली होती. मात्र, यावषी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत अमिताभ बच्चन यांची माफी मागितली होती. फिल्मसिटीतील अनेक मान्यवरांबरोबरच कित्येक उद्योगपतींशीही त्यांचे घनिष्ट संबंध होते.
समाजवादी पक्षापासून दुरावा
समाजवादी पक्षाची कमान अखिलेश यादव यांच्या हातात आल्यापासून अमर सिंह हे पक्षातील कार्यक्रम, निर्णय प्रक्रियेतून दूर होऊ लागले होते. 2017 मध्ये समाजवादी पक्षात झालेल्या वादानंतर त्यांना अखिलेश यादव यांना खलनायक ठरवत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. इतकेच नाही तर राज्यसभेचे खासदार प्रो. रामगोपाल वर्मा यांनीही अमर सिंह यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर समाजवादी पक्षापासूनही ते काहीसे दूर झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपशी जवळीक वाढवली होती. गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ते आजारी होते.