अत्याचार रोखण्यासाठी शिवकालीन मर्दानी कला शिका
अमोल बुचडे यांचे आवाहनः शिवकालीन खेळ प्रशिक्षण शिबिराचा समारोप
वार्ताहर / वैभववाडी:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धकलेचे जतन होणे काळाची गरज आहे. सध्याच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी या कला अत्यंत उपयुक्त आहेत. महिलांना संरक्षण करता यावे, यासाठी शिवकालीन मर्दानी कला अवगत करणे काळाची गरज आहे, असे मत कोल्हापूर येथील शिवशाहू मर्दानी आखाडा या संस्थेचे प्रशिक्षक अमोल बुचडे यांनी येथे व्यक्त केले.
येथील दत्त मंदिर येथे ‘आम्ही वैभववाडीकर’ या संस्थेच्यावतीने आयोजित शिवकालीन खेळ प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योजक विकास काटे, मंगेश कदम, संतोष टक्के, महेश रावराणे, विद्याधर सावंत, नंदू रावराणे, गंगाधर केळकर, बंडू सावंत, सचिन रावराणे आदी उपस्थित होते. बुचडे म्हणाले, शिवकालीन गडकिल्ल्यांवरील शिवरायांच्या आठवणी सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्या आठवणींना दरवर्षी उजाळा दिला जातो. शिवशाहू मर्दानी आखाडा- कोल्हापूरच्यावतीने शिवप्रताप दिन, स्वराज्याभिषेक दिन, किल्ले भ्रमंती आदी कार्यक्रम साजरे केले जातात. तरुण-तरुणी दुर्गभ्रमंती मोहीम करावी. मर्दानी खेळ महिलांनीही अवगत करणे गरजेचे आहे. महिलांनाही अशा खेळाचे ज्ञान आत्मसात करून आपले स्वसंरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
65 विद्यार्थ्यांनी घेतले युद्धकलेचे प्रशिक्षण वैभववाडी व करुळ येथे 1 जानेवारीपासून दहा दिवसांचे हे प्रशिक्षण घेण्यात आले. करुळ येथील युद्धकलेच्या प्रशिक्षणासाठी भैया कदम यांचे सहकार्य लाभले. करुळ गावातील 30 विद्यार्थ्यांनी, तर वैभववाडीतील 35 विद्यार्थ्यांनी शिवकालीन कलेचे प्रशिक्षण घेतले. यामध्ये तलवारबाजी, भालाफेक, काठीफेक, लिंबू मारणे, युद्धकलेचे इतर सर्व प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण सहाय्यक प्रशिक्षक प्रथमेश चव्हाण, श्रेयश बावले, अभिषेक पाटील, साक्षी माजगावकर, युक्ता माने यांनी दिले. दरम्यान, समारोपप्रसंगी प्रशिक्षणार्थिंनी युद्धकलांचे सादरीकरण केले.