अज्ञात वाहनाच्या धडकेने शिक्षकाचा जागीच मृत्यू
खेड-आपेडे फाट्यानजीकची घटना, -चालकाचे घटनास्थळावरून पलायन
प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील आपेडे फाट्यानजीक मुबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने तालुक्यातील वडगाव खुर्द जि. प. प्राथमिक शाळेचे शिक्षक स्वप्निल संजय भाटकर (40 रा. भरणे) यांचा जागीच मृत्यू झाला. यात त्यांचे सहकारीही जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. हा अपघात बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास घडला.
विनोद वसंत जाधव (42) असे जखमी सहकाऱ्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. एमएच 08 बी. बी. 1073 क्रमांकाच्या दुचाकीवरून स्वप्नील भाटकर सहकारी विनोद जाधव यांच्यासह आपेडे फाटा येथून उजव्या बाजूला कळंबणी बुद्रुकच्या दिशेला वळण घेत असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, स्वप्निल भाटकर यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने 10 फुट फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीच्या पाठीमागे बसलेले विनोद जाधव यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर अज्ञात वाहन नजीकच्या प्रवासी शेडमध्ये घुसले. अशाही परिस्थितीत अपघाताची माहिती न देताच वाहनचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. या वाहनचालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी लवेल येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. या पाठोपाठच भरणे येथेही झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे बनले असून राष्ट्रीय महामार्ग सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
2011 मध्ये सेवेत ऊजू
मूळचे अकोला जिह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील मुरंबा गावचे रहिवासी असलेले स्वप्निल भाटकर 2011 मध्ये सेवेत दाखल झाले. वडगाव खुर्द प्राथमिक शाळेत ते कार्यरत होते. 4 महिन्यापूर्वी त्यांना शिरवली प्राथमिक शाळेवर कामगिरीवर काढण्यात आले होते. काही कामानिमित्त शाळेत जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या अपघाताचे वृत्त कळताच शिक्षकांनी त्यांच्या भरणे येथील निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या पश्चात आई-वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे