अंध ग्राहकाला बँकेकडून अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड
बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखेविरुद्ध म्हस्कर यांची तक्रार
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोना कालावधीत हाऊसिंग लोनचा हप्ता भरण्याबाबत बँकेकडून देण्यात आलेल्या अयोग्य माहितीमुळे अंध फिजिओथेरेफिस्ट माधव म्हसकर यांना दहा हजार सोळा रुपयांचा अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड बसला असल्याची बाब समोर आली आहे. हप्ता भरण्याएवढी पुरेशी रक्कम त्यांच्या खात्यात असतानाही बँकेने हप्ता कापून घेतला नाही. सहा महिन्यानंतरच्या लोन रि स्ट्रक्चरिंगमध्ये व्याज कमी होणार असल्याचे सांगून अतिरिक्त व्याज आकारले. असा आरोपही त्यांनी केला असून सहा महिन्यांच्या हप्त्याची सर्व रक्कम भरून घेऊन बँकेने अतिरिक्त व्याज रद्द करावे, अशी मागणी केली आहे.
बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेतील या प्रकाराबाबत त्यांनी ‘तरुण भारत’कडे कैफियत मांडली आहे. यावेळी माहिती देताना म्हसकर म्हणाले की, 2009 साली या बँकेकडून आपण गृहकर्ज घेतले होते. दर महिन्याला 4590 रुपये असणारा हप्ता फेब्रुवारी 2020 पर्यंत नियमित भरला आहे. मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हप्ता भरताना करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित अधिकाऱयांनी सरकारने तीन महिन्यांसाठी हप्ता पोस्ट पेमेंटची सवलत जाहीर केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तीन महिने हप्त्याची कपात करण्यात आली नाही. त्यानंतर ऑगस्टपर्यंत पुन्हा तीन महिन्यांची हप्ता पोस्ट पेमेंटची मुदत सरकारकडून वाढविण्यात आली. त्यामुळे ऑगस्टपर्यंत हप्ता घेतला जाणार नसल्याचे सांगण्यात आले.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात लोन रिस्ट्रक्चरिंगबाबत मेसेज आला. त्यानुसार 1950 रुपये भरून लोनचे रिस्ट्रक्चरिंग करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी यांनी व्याज कमी होणार असल्याचे सांगितले. मात्र, संपूर्ण प्रक्रियेनंतर पासबुकच्या नोंदी तपासल्या असता यामध्ये मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी 10,016 रुपयांचे अतिरिक्त व्याज आकरण्यात आल्याचे लक्षात आले.
दरम्यान, आपल्या खात्यात या कालावधीत दर महिन्याचा हप्ता वेळच्यावेळी कपात करण्याएवढी पुरेशी रक्कम असतांनाही ती कपात केली गेली नाही. चुकीच्या माहितीचा आपल्याला नाहक भुर्दंड बसला. आपण अंध असून बँकेने सहा महिन्यांचे 4,590 प्रति महिनाप्रमाणे 27 हजार 540 रुपये भरून घ्यावेत आणि 10 हजार रुपयांचे आकारण्यात आलेले अतिरिक्त व्याज रद्द करावे, अशी मागणी केली आहे.