For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Cyber Crime News : वृद्धेच्या बँक खात्यातून ७ लाख गायब

09:28 AM Aug 31, 2026 IST | NEETA POTDAR
cyber crime news   वृद्धेच्या बँक खात्यातून ७ लाख गायब
Advertisement
                              महिलेच्या बँक खात्यावर सायबर चोरट्यांनी डल्ला
Advertisement

कागल : पतीच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची रक्कम जपून ठेवलेल्या कागल शहरातील एका वृद्ध महिलेच्या बँक खात्यावर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला. अवघ्या काही तासांत पाच व्यवहारांच्या माध्यमातून तब्बल ६ लाख ९९ हजार ९७० रुपये खात्यातून परस्पर काढून घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित वृद्ध महिलेच्या पतीचे निधन झाले असून, पतीच्या नोकरीतून मिळालेली आयुष्यभराची कमाई त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या कागल शाखेतील खात्यावर जमा होती. त्या आपल्या मुलासोबत राहत आहेत. मात्र, १४ ऑगस्टच्या रात्री त्यांच्या खात्यातून संशयास्पद पद्धतीने रक्कम वळती करण्यात आली.
१४ ऑगस्टच्या रात्री ११ वाजल्यापासून १५ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत खात्यातून एकूण पाच व्यवहार झाले. यातील व्यवहारांचे संदेश वृद्ध महिलेच्या मोबाईलवर प्राप्त झाले. विशेष म्हणजे रात्री २.४० ते ३.०५ या अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीत हे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, संबंधित महिलेच्या मुलाचा मोबाईल हॅक करून त्यावर अज्ञात व्यक्तीकडून एपीके फाईल पाठविण्यात आली होती. ही फाईल डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलचा गैरवापर करून बँक खात्यातील रक्कम लंपास करण्यात आल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.
खात्यातून मोठी रक्कम परस्पर काढण्यात आल्याचे लक्षात येताच संबंधितांनी तातडीने बँकेशी संपर्क साधला. पुढील आर्थिक व्यवहारांना आळा घालण्यासाठी बँकेकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर पोलीस ठाणे तसेच सायबर पोलिसांकडे धाव घेण्यात आली.
 
मात्र, तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे आणि सायबर पोलिसांच्या अनेक चक्रा माराव्या लागल्याचा आरोप संबंधितांकडून करण्यात आला आहे. अखेर शनिवारी रात्री कागल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास कागल पोलिसांकडून सुरू आहे.
Advertisement

 

Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.