बंद खात्यातील 50 कोटी पडून
सांगली :
सलग दहा वर्षे बंद 1 लाख 91 हजारावर खातेदारांची 50 कोटी रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यात आली आहे. संबधित खातेदारांनी आवश्यक ती कागदपत्रे दिल्यास जिल्हा बँक खातेदारांना रक्कम परत करेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.
नियमानुसार खात्यावर सलग दहा वर्षे एकदाही उलाढाल झाली नसेल ते खाते नॉन वर्कींग होते, त्या खात्यावर असलेली शिल्लक रिझर्व्ह बँकेला पाठवावी लागते. जिल्ह्यातील सर्व शाखांतील सुमारे 1 लाख 91 हजार 132 खातेदारांची 49 कोटी 49 लाख 27 हजार रक्कम विविध कारणांनी बंद असलेल्या खात्यांमध्ये होती. ही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याबाबत जिल्ह बँकेला सुचना करण्यात आली होती.
पहिल्या टप्प्यात 75 हजार 759 खातेदारांचे 20 कोटी 45 लाख आठ हजार तर दुसऱ्या टप्प्यात एक लाख 15 हजार 373 खातेदारांची 29 कोटी चार लाख 19 हजार इतकी रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली आहे. त्यानुसार बँकेने दोन टप्य्यात ही रक्कम रिझर्व्ह बँकेच्या खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती शिवाजीराव वाघ यांनी दिली.