हुबळीत शेतकऱ्यांचा एल्गार; उसाला 5,500 रुपये दराची मागणी
एफआरपी वाढीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा : आंदोलनस्थळी येण्याचे प्रल्हाद जोशींनी आव्हान
त. भा. वार्ताहर / हुबळी
उसाला प्रतिटन 5,500 रुपये किमान दर द्यावा, एफआरपीमध्ये वाढ करावी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची पूर्ण अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी हुबळीतील राणी चन्नम्मा चौकात हजारो शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. कर्नाटकासह महाराष्ट्रातील शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह ऊस उत्पादकही आंदोलनात सहभागी झाले होते.
उसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा दर अपुरा आहे. कृषी उत्पादनांना उत्पादन खर्चावर आधारित वैज्ञानिक व लाभदायक दर निश्चित करावा, उसाची एफआरपी वाढवावी, अशी मागणी आहे.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरीनेते शशिकांत गुरूजी यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून मागण्या मान्य करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. गेल्या अनेक वर्षांत उसाच्या दरात अपेक्षित वाढ झालेली नसल्याने एफआरपीमध्ये मोठी वाढ करावी. उत्तरप्रदेश व गुजरातच्या धर्तीवर कर्नाकातील उत्पादकांकडून 100 टक्के इथेनॉल खरेदी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी दिल्लीला येण्याचे आवाहन केले होते. मात्र, हे निमंत्रण आंदोलनकर्त्यांनी नाकारले. जोशी यांनी स्वत: आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकाव्यात, अशी मागणी शशिकांत गुरूजी यांनी केली. सायंकाळपर्यंत मंत्री आंदोलनस्थळी न आल्यास आंदोलनाची दिशा बदलण्याचा इशाराही त्यांनी दिला.
कर्नाटक राज्य शेतकरी संघ व हरित सेनेचे राज्याध्यक्ष चुन्नप्पा पुजारी म्हणाले, एक टन ऊस उत्पादनासाठी सुमारे 4,500 ऊपये खर्च येतो. मात्र, शेतकऱ्यांना त्यानुसार मोबदला मिळत नसल्याने एफआरपी वाढविणे आवश्यक आहे. ऊस व साखरेला योग्य दर मिळावा आणि राज्यातील उत्पादकांकडून 100 टक्के इथेनॉल खरेदीची हमी सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. खतांचे दर आणि उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांना लाभदायक दर देण्यासोबतच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे, अशी मागणी शेतकरी संघाचे सचिव विद्यासागर यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरीही आंदोलनात सहभागी झाल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते.