सौदी अरेबियात आढळले पुरातन मंदिर
हे हिंदू मंदिर असल्याचे काहींचे प्रतिपादन, पुरातत्व विभागाकडून शोधकार्य, इतिहास प्रकाशात येणार
वृत्तसंस्था / रियाध
इस्लाम धर्माचे मूलस्थान असणाऱ्या सौदी अरेबिया या देशातील पुरातत्व विभागाला तेथे एक 8 हजार वर्षांपूर्वीचे पुरातन मंदीर आढळले आहे. हे मंदीर ‘कहल’ या देवतेचे असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या देशाच्या ‘अल फा’ या पुरातत्व स्थानी या मंदिराचा शोध लागला आहे. या शोधामुळे जगभरात मोठीच खळबळ उडाली असून अनेकांचे औत्सुक्य जागृत झाल्याचे दिसून येत आहे.
या भागात गेल्या 10 हजार वर्षांपासून प्रगत मानवी वस्ती असल्याचे पुरावे यापूर्वीही मिळाले आहेत. आता या मंदिराचा शोध लागल्याने या भागात प्राचीन संस्कृती नांदत होती, याची शाश्वती झाली आहे. या मंदिराचा शोध ऐतिहासिक आणि दिशादर्शक मानला जात आहे. हे हिंदू देवतेचे मंदिर असल्याचे काही तज्ञांचे प्रतिपादन आहे. तथापि, यासंबंधातील चित्र सखोल संशोधनातंरच स्पष्ट होणार आहे. मात्र, या भागात पुरातन काळी मूर्तीपूजा चालत होती, हे दर्शविणारा हा महत्वाचा पुरावा आहे, यावर तज्ञांचे एकमत झाले आहे.
नवपाषाण युगातील मंदीर
हे मंदीर नवपाषाण युगातील आहे. या परिसरात 2 हजारांहून अधिक ग्रेव्हज सापडल्या आहेत. त्याकाळात जगभरात मृतदेहांना पुरण्याची पद्धत होती. ती याही भागात होती, हे दर्शविणाऱ्या या ग्रेव्हज आहेत. हे मंदीर प्रचंड खडकात कोरलेले असून त्याचा विस्तार बराच आहे. ते तुवैक नामक पर्वताच्या परिसरात असून त्याचे स्थानिक भाषेतील नाव खाशेम कारिया असे आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
सौदी अरेबियाच्या प्रशासनाने आपल्या देशाचा पुरातन इतिहास शोधण्यासाठी पुरातत्व विभागाची स्थापना काही वर्षांपूर्वी केली होती. या संस्थेने अल-फा भागात एका मोठ्या प्राचीन शहराचाही शोध लावला आहे. याच शहरानजीक हे मंदीर असल्याने त्याकाळात सर्वसामान्य लोकही मंदिरांमध्ये जात असत, ही बाब स्पष्ट झाली आहे. या मंदिराचे उत्खनन करण्यासाठी या संस्थेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला असून त्यामुळे उत्खनन योग्यरित्या करण्यात आले आहे.
कहल देवता कोण आहे...
कहल किंवा कल्ह तसेच कल अशा नावांनी ओळखली जाणारी या मंदिराची देवता या भागात पुरातन काळापासून मानली जाते. या देवतेचे पूजन ‘किंदाह’ तसेच मधीज या जमातीचे लोक करीत असत. करयाल अल् फा हे शहर याच जमातींनी वसविले होते, अशी मान्यता आहे. हे शहर किंदाह या राज्याची राजधानी होती. कहल ही देवता स्थानिक होती, असेही अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, या मंदिराचा पुरातन भारताशी किंवा हिंदू संस्कृतीशी संबंध होता काय, यावर विवाद आहे. इस्लामपूर्व काळात सौदी अरेबियात हिंदू धर्म आणि त्याच्या प्रथा तसेच मंदिरे आणि स्थाने अस्तित्वात होती, असे सिद्ध झाले आहे. तथापि, हे मंदीर हिंदूधर्माशी संबंधित नाही, असेही काही तज्ञांचे म्हणणे आहे.
प्राचीन मंदिराच्या शोधामुळे औत्सुक्य
ड सौदी अरेबियात सापडलेल्या मंदिरामुळे इतिहासप्रेमींना नवा उत्साह
ड या भागात दहा हजार वर्षांपासूंन मूर्तीपूजा चालत असल्याचे पुरावे
ड या मंदिराच्या सखोल अभ्यासानंतरच त्याचे स्वरुप स्पष्ट होणे शक्य