सीमा कालीरमनला थाळीफेकमध्ये चौथे स्थान
वृत्तसंस्था/ नागोया,
सीमा कालीरमन हिने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करूनही महिलांच्या थाळीफेक थाळीफेकममध्ये चौथे स्थान पटकावले. सीमाने तिच्या पाचव्या प्रयत्नात 59.88 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली, पण ते पुरेसे ठरले नाही कारण तिन्ही विजेत्यांची सर्वोत्तम कामगिरी 60 मीटरपेक्षा जास्त होती. स्पर्धेच्या मध्यापर्यंत सीमा तिसऱ्या स्थानावर होती, पण थायलंडच्या सुबेनरत इनसाएंगने तिच्या चौथ्या प्रयत्नात 61.43 मीटरची कामगिरी नोंदवून तिसरे स्थान पटकावले. चीनच्या फेंग बिन (63.83 मीटर) आणि जियांग झिचाओ (62.25 मीटर) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली, तर सुबेनरतने कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेतील दुसरी भारतीय खेळाडू, सान्या यादव शेवटच्या आठव्या स्थानावर राहिली.
कंपाऊंड तिरंदाजी : चिकिता व गणेश उपांत्यपूर्व फेरीत दाखल
गतविजेती ज्योती सुरेखा वेन्नम हिचा 14 वर्षीय कोरियन खेळाडू कांग येओन्सेओने 150 गुणांसह अचूक कामगिरी करत धक्कादायक पराभव केला, मात्र पदार्पण करणाऱ्या चिकिता तनिपार्थी आणि गणेश मणिरत्नम थिरुमुरु या जोडीने महिला आणि पुरुष वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चिकिताचा उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या नुरिसा डियान अश्रिफाहशी सामना होईल तर गणेशचा चायनीज तैपेईच्या चेन चिएह-लुनशी होईल.
रिकर्व्ह तिरंदाजी : बोम्मदेवरा,चौहान उपांत्यपूर्व फेरीत

भारतीय तिरंदाज धीरज बोम्मादेवरा, नीरज चौहान आणि कुमकुम मोहोड अनिल यांनी प्रभावी विजय मिळवून रिकर्व्ह प्रकाराच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या वैयक्तिक 1/8 एलिमिनेशन फेरीत चौहानने दक्षिण कोरियाच्या तीन वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या 22 वर्षीय किम जे देओकचा 6-4 (30-28, 29-29, 29-30, 29-29, 29-27) असा धक्कादायक पराभव केला. बोम्मादेवराने चायनीज तैपेईच्या चेंग शियांग-हुईवर 6-2 (29-27, 27-28, 30-28, 29-28) असा मात केली. आता बोम्मादेवराचा सामना उझबेकिस्तानच्या अमीरखोन सादिकोव्हशी होईल, तर चौहानचा सामना भूतानच्या लाम दोरजीशी होईल.
स्क्वॅश : भारतीय पुरुष, महिला उपांत्यपूर्व फेरीत दाखल

स्क्वॅशमध्ये भारताच्या दोन्ही संघांनी आगेकूच केली. महिला संघाने जपानवर चिवट विजय मिळवला. तिसरे मानांकन असलेल्या भारतीय महिला संघाने जपानवर 2-1 ने मात केली, मात्र त्यांची प्रमुख खेळाडू अनाहत सिंग जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या सातोमी वातानाबेकडून पाच गेममध्ये पराभूत झाली. विक्रमी सातव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या अनुभवी जोश्ना चिनप्पाने एरिका सानोवर 11-1, 11-8, 11-9 असा विजय मिळवून भारताला जपानवर 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. निर्णायक सामन्यात, तन्वी खन्नाला अकारी मिडोरिकावाविरुद्ध 12-10, 11-9, 4-11, 12-10 असा विजय मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, ज्यामुळे भारताने सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले तर पुरुष संघाने दक्षिण कोरियाला एकही गुण मिळवू न देता उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. सलामीच्या एकेरी सामन्यात, वेलवन सेंथिलकुमारने जूयॉन्ग नाचा 11-6, 11-4, 11-7 असा पराभव केला, तर त्यापाठोपाठ एकेरीतील रौप्यपदक विजेता अभय सिंगने जोंगमिन रियूवर 11-4, 11-7, 11-1 असा सहज विजय मिळवला.
टेनिस : दक्षिणेश्वर पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत
दक्षिणेश्वर सुरेशने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या गुणावन त्रिसमुवंतराचा 7-5, 7-6 (7-2) असा पराभव करत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. पहिल्या फेरीत त्याला बाय मिळाला होता.
व्हॉलीबॉल : रोमांचक सामन्यात भारतीय पुरुष संघाची कतारवर मात
भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत, कतारवर 3-2 असा चुरशीचा विजय नोंदवला आणि मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पूल सी मधील हा सामना दोन तास 47 मिनिटे चालला. या सामन्यात भारतीय संघाने दोन सेट्सने पिछाडीवर असताना पुनरागमन करत कतारचा 26-28, 25-27, 25-23, 25-20, 24-22 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीचे सर्व चार सामने गुरुवारी खेळले जातील.
भारतीय कॅनो स्लॅलोम खेळाडू उपांत्य फेरीत
पुरुष कयाक सिंगल आणि महिला कॅनो सिंगल प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष कयाक सिंगलच्या हीटमध्ये, हितेश केवटने 118.22 सेकंदांची वेळ नोंदवत आठवे स्थान पटकावले, तर प्रद्युम्न सिंग राठोड 127.70 सेकंदांची वेळ नोंदवत दहाव्या स्थानी राहिला. महिला कॅनो सिंगलच्या हीटमध्ये, पल्लवी जगतापने 224.20 सेकंदांची वेळ नोंदवत सातवे स्थान पटकावले, तर रीना सेनने 342.72 सेकंदांची वेळ नोंदवत नववे स्थान मिळवले. हे चारही भारतीय पॅडलर्स बुधवारी आपापल्या उपांत्य फेरीत स्पर्धा करतील, त्याच दिवशी पदकांसाठीच्या फेऱ्याही होणार आहेत. महिला कयाक सिंगलमध्ये, शिखा चौहान 344.87 सेकंदांची वेळ नोंदवत हीटमध्ये शेवटून दुसऱ्या स्थानी राहिली आणि ती गुरुवारी उपांत्य फेरीत स्पर्धा करेल.