सिंधू जल करारासाठी युद्ध छेडण्याची तयारी
सहाही नद्यांचे पाणी हिसकावून घेणार : बिलावल भुट्टो यांची भारताला धमकी
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू पाणी करारावरील वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. या मुद्यावर बोलताना पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. बिलावलची धमकी भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानानंतर आली आहे. सिंधू करार पुनर्संचयित करण्याचा भारताचा कोणताही हेतू नाही, असे शाह यांनी म्हटल्यानंतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल पुन्हा एकदा दिशाभूल करणारे वक्तव्य करत आपण भारताविरोधातील युद्ध जिंकल्याचे म्हटले आहे. यासोबतच आपण सिंधू जलवाटप करारप्रश्नी भारतासोबत युद्ध छेडण्यास तयार असल्याची धमकीही त्यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अमित शाह यांच्या विधानाला विरोध केला आहे. बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले की, जर सिंधू जलवाटप करार पुनर्संचयित झाला नाही तर पाकिस्तान सर्व सहा नद्यांवर हल्ला करून ते ताब्यात घेऊ शकतो.
एका रॅलीत बोलताना बिलावल म्हणाले, ‘भारताकडे फक्त दोनच पर्याय आहेत. एकतर ते सिंधू पाणी करार मान्य करेल आणि तो चालू देईल किंवा पाकिस्तानशी युद्धासाठी तयार राहील.’ असे धमकीवजा विधान बिलावल यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वीही सिंधू करारावर भाष्य करताना ‘नद्यांमध्ये पाणी वाहणार किंवा भारतात रक्त वाहील’ अशी आक्रमक विधाने केली होती.
...हा अस्तित्वाचा प्रश्न!
पाकिस्तानला शांतता हवी आहे पण सिंधू करारावर भारताची कृती युद्धाच्या घोषणेसारखी आहे. ही पाकिस्तानसाठी अस्तित्वाची लढाई आहे, त्यासाठी कोणतीही हद्द पार केली जाईल, असे बिलावल भुट्टो म्हणाले. आम्ही सिंधू संस्कृतीचे रक्षक आहोत आणि तिचे रक्षण करू. यासाठी आम्ही युद्धाच्या मार्गावर जाण्यास मागे हटणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
बिलावल भुट्टो यांनी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी करताना पाकिस्तानचे पाणी थांबवले तर युद्धाशिवाय पर्याय राहणार नाही. या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत दशके जुना सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. अलिकडेच भारतीय गृहमंत्री अमित शाह यांनी करार पुन्हा सुरू करण्याची शक्यता फेटाळून लावत हा करार आता कधीही पुनर्संचयित होणार नसल्याचे जाहीर केले होते. शाह यांच्या या विधानानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.