सांगेली नवोदय विद्यालयात ताप-सर्दीची साथ; अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; आरोग्य यंत्रणा सतर्क; 100 हून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सर्दी-तापाच्या रुग्णांत वाढ होत असताना सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्येही ताप आणि सर्दीची लक्षणे आढळून आली आहेत. आतापर्यंत 100 हून अधिक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी काही विद्यार्थ्यांना तापाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.
गणेश चतुर्थीच्या सुट्टीसाठी अनेक विद्यार्थी आपल्या गावी गेले होते. सुट्टी संपल्यानंतर दोन दिवसांपूर्वी विद्यार्थी पुन्हा वसतिगृहात दाखल झाले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना ताप, सर्दी आणि अस्वस्थतेची लक्षणे जाणवू लागली. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे लक्षात येताच विद्यालय प्रशासनाने त्यांना सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी नेले.
पहिल्या टप्प्यात 72 विद्यार्थ्यांचे रक्त नमुने घेण्यात आले. त्यापैकी 36 विद्यार्थ्यांना ताप असल्याचे आढळले. त्यानंतर शनिवारी आणखी सुमारे 50 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 13 विद्यार्थ्यांमध्ये तापाची लक्षणे आढळून आली. संबंधित विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाकडून पाहणी
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी विद्यालय परिसराची पाहणी केली. सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी घोडे यांनी विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
सध्या तापाची साथ सुरू असून विद्यार्थ्यांची नियमित तपासणी केली जात आहे. रक्त तपासण्यांमध्ये घाबरण्यासारखे काही आढळले नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर काही पालकांनी विद्यालयात धाव घेतली. काही पालकांनी आपल्या मुलांना घरी नेणे पसंत केले. त्यामुळे पालकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.
पालकांना घाबरू नये, आरोग्य विभागाचे आवाहन
पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव यांनी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांची आणि पालकांची विचारपूस केली. तसेच आरोग्य यंत्रणेला आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
“पालकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विद्यार्थ्यांनी उकळून थंड केलेले पाणी प्यावे,” असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, विद्यालय आणि परिसरात आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य अवनी राऊळ, प्रथमेश सावंत, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.