सर्वजण गणपतीचं विसर्जन करुन मंडपात परतले, दोन कार्यकर्ते शौचालयात गेले अन् परतलेच नाहीत; विषारी वायू ड्रेनेजमधून आत शिरल्याने झाला मोठा अनर्थ
मुंबई | प्रतिनिधी : मुंबईच्या गोरेगाव पूर्वेतील राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात विषारी वायू पसरल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रभाकर धनिवर (24) आणि भाविक देसाई (18) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळील शिवशंकर चाळ परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक शौचालयाच्या शेजारी असलेल्या एका कारखान्यात रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. कारखान्यातील रसायन सांडपाण्याच्या ड्रेनेजमध्ये सोडण्यात आल्याने त्यातून विषारी वायू तयार झाल्याचा प्राथमिक संशय आहे. हा वायू ड्रेनेजमार्गे सार्वजनिक शौचालयात शिरल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी गणेश विसर्जनानंतर साई कृपा मित्र मंडळाचे कार्यकर्ते पुन्हा मंडपात परतले होते. त्यानंतर भाविक आणि प्रभाकर हे दोघे सार्वजनिक शौचालयात गेले. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने मंडळातील कार्यकर्त्यांनी शौचालयात जाऊन पाहिले. त्यावेळी परिसरात तीव्र रासायनिक दुर्गंधी पसरली होती आणि दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार रविंद्र वायकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. संबंधित कारखान्यावर कारवाई करण्यासोबतच मुंबईत अनधिकृतपणे सुरू असलेल्या रासायनिक कारखान्यांवर आणि त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
या प्रकरणी वनराई पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, प्राथमिक माहितीनुसार कारखान्यातून रासायनिक गळती झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू असून, तपासानंतर विषारी वायू नेमका कसा तयार झाला आणि दोघांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.
गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे राम मंदिर परिसरात शोककळा पसरली आहे.