संसदेसमोरील ‘देणगी अपहार’ पप्पू यादव यांच्या अंगलट
दिल्ली, लखनौ येथे एफआयआर दाखल : ठिकठिकाणी निदर्शने
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
अयोध्या राम मंदिरातील देणग्यांच्या अपहार प्रकरणाचा निषेध करताना संसद परिसरात भगवे कपडे घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्याचा प्रकार खासदार पप्पू यादव यांच्या अंगलट आला आहे. बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार राजेश रंजन म्हणजेच पप्पू यादव यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सनातन धर्माचा अपमान केल्याच्या आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली दिल्ली आणि लखनौसह अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी निदर्शनेही झाली आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शुक्रवार, 31 जुलै रोजी पप्पू यादव यांनी संताचा वेश धारण करून, राम मंदिरातील देणग्यांच्या अपहाराशी संबंधित एक पथनाट्या संसद परिसरात सादर केले. या प्रतिकात्मक प्रदर्शनावेळी राहुल गांधी, डिंपल यादव, अवधेश प्रसाद आणि विरोधी पक्षांमधील इतर काही खासदारांनीही सहभाग घेतला होता. या आंदोलनादरम्यान पप्पू यादव यांनी प्रभू रामलल्ला यांचा फोटो आपल्या पायाजवळ ठेवला होता. यावरूनच खासदार पप्पू यादव यांच्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू झाली असून, अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
सूर्य मैथिल यांनी दिल्लीतील जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात खासदार पप्पू यादव यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या आंदोलनामुळे सनातन्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असे गुन्हा दाखल केल्यानंतर सूर्य मैथिल म्हणाले. आपण याविरोधात जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात सामील असलेल्या सर्वांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी गृहमंत्री अमित शाह, दिल्ली पोलीस आयुक्त, डीसीपी उत्तर, डीसीपी वायव्य, एसीपी जहांगीरपुरी आणि एसएचओ जहांगीरपुरी यांच्याकडेही केली आहे.