संसद घुसखोरी : पुरवणी आरोपपत्र सादर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्यावर्षी संसदभवनात काही तरुणांनी केलेल्या घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे. या प्रकरणी मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे, नीलम, ललित झा तसेच महेश कुमावत यांच्या विरोधात आरोप ठेवण्यात आले आहेत. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्लीच्या उपराज्यपाल यांनी या आरोपींच्या विरोधात युएपीएअंतर्गत प्रकरण चालविण्यास संमती दिली असल्याची माहिती आहे.
13 डिसेंबर 2013 या दिवशी संसदेचे अधिवेशन सुरु असताना या तरुणांपैकी तिघांनी संसद सदनात पासवर प्रवेश मिळवून प्रेक्षकांच्या सज्जातून सभागृहात बेकायदा प्रवेश केला होता. तसेच तेथे त्यांनी रंगीत धुराची नळकांडीही फोडली होती. यावेळी लोकसभेचे कामकाज होत होते आणि अनेक खासदार सभागृहात होते. धूर पसरल्याने मोठीच घबराट उडाली होती. नंतर हे तरुण आणि त्यांचे संसदसदनाबाहेर असलेले तीन सहकारी यांना अटक करण्यात आली होती.
समीक्षा समितीचा निर्णय
या आरोपींच्या विरोधात युएपीए (अनलॉफुल असेंब्ली प्रिव्हेन्शन अॅक्ट) या कठोर कायद्याच्या अंतर्गत अभियोग चालविण्यास दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी अनुमती दिली होती. त्याआधी हे प्रकरण समीक्षा समितीकडे देण्यात आले होते. समितीने गुन्ह्यांची गंभीरता पाहता युएपीए कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याची सूचना केंद्र सरकारला आणि पोलिसांना केली होती.
भक्कम पुरावे
या प्रकरणी सर्व आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत. संसदेतील सीसीटीव्ही फूटेजमधूनही त्यांचा गुन्हा स्पष्ट झाला आहे. त्यामुळे आरोपींच्या विरोधात लवकरात लवकर सुनावणी केली जाणार आहे. या प्रकरणात ते दोषी ठरण्याची दाट शक्यता आहे, असे प्रतिपादन दिल्ली पोलिसांनी केले आहे.