‘संभल’मधील मृतांच्या वारसांना ‘सपा’कडून प्रत्येकी 5 लाख रुपये
अखिलेश यादव यांची घोषणा : योगी सरकारलाही आवाहन
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशातील संभल येथील वादग्रस्त जामा मशीद संकुलात सर्वेक्षणादरम्यान उसळलेल्या हिंसाचारावरून बरेच राजकारण सुरू आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा शनिवारी समाजवादी पक्षाकडून करण्यात आली. या मुद्यावर आवाज उठविण्यासाठी समाजवादी पक्षाच्या 15 सदस्यीय शिष्टमंडळाला शनिवारी एकत्र यायचे होते. मात्र त्यांना प्रशासनाने परवानगी दिलेली नाही.
उत्तर प्रदेशातील संभल येथील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना समाजवादी पक्षाने भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. तसेच योगी सरकारने मृतांच्या कुटुंबीयांनाही मदत करावी, असे सपाचे म्हणणे आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारनेही प्रत्येकी 25 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आवाहन अखिलेश यादव यांनी केले आहे.
संभलमध्ये मशिदीतील सर्वेक्षण करण्याला विरोध झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून हिंसाचाराची परिस्थिती निर्माण झाली आहे. तणावग्रस्त परिस्थितीमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संभलमध्ये कलम 163 लागू करण्यात आले आहे. सपाच्या अनेक नेत्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी यूपीमधील प्रशासनाच्या मुद्यावर भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. अखिलेश यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी संभल घटनेसाठी थेट योगी सरकार आणि प्रशासनाला दोषी ठरवले. पहिल्या दिवशी सर्वेक्षणात सर्वांनी सहकार्य केल्याने सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. मग दुसऱ्या दिवशी सर्वेक्षण का करण्यात आले? दुसऱ्या दिवशीची पाहणी जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पाहणीसाठी आत गेलेल्या लोकांनी जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्यासाठी घोषणाबाजी केली. यात प्रशासनाचे अधिकारी गुंतले आहेत, असे अखिलेश यादव म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.