For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्री मंगाई देवी यात्रेपूर्वी समस्या मार्गी लावा

06:01 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्री मंगाई देवी यात्रेपूर्वी समस्या मार्गी लावा
Advertisement

श्री मंगाईनगर रहिवासी संघाच्यावतीने महानगरपालिकेला निवेदन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : सालाबादप्रमाणे यंदाही वडगाव येथील श्री मंगाई देवीची यात्रा 11 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र, पाटील गल्ली, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, वझे गल्ली, धामणे रोड, यरमाळ रोड, मंगाईनगर येथे 24 तास पाणी योजनेसाठी खोदकाम करण्यात आलेल्या चरी अद्याप बुजविण्यात आलेल्या नाहीत. तसेच इतर समस्याही आहेत. त्यामुळे यात्रेपूर्वी सर्व समस्या मार्गी लावाव्यात, अशा मागण्यांचे निवेदन शुक्रवार दि. 31 रोजी श्री मंगाईनगर रहिवासी संघाच्यावतीने महानगरपालिकेला देण्यात आले.

Advertisement

वडगाव येथील श्री मंगाई देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरविली जाते. यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदा 11 ऑगस्ट रोजी यात्रेला सुरुवात होणार आहे. तर सदर यात्रा चार ते पाच दिवस चालणार आहे. मात्र, एल अँड टी कंपनीकडून वडगाव परिसरात जलवाहिनी घालण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. पण सदर चरी बुजविण्यात आल्या नसल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याचबरोबर मंगाईनगरला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे ख•s पडले आहेत. हनुमान तलावापर्यंत दोन्ही बाजूला गटारी नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी थांबून रहात असल्याने तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मंगाईदेवी परिसरातील पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरच थांबत आहे. श्री मंगाई तलाव रोडच्या ब्रह्मलिंग मंदिरापर्यंत वाहने थांबवण्यास निर्बंध घालण्यात यावेत, त्याचबरोबर तेथील कचराकुंड अन्यत्र हलवावेत, यात्रेपूर्वी सर्व समस्या मार्गी लावण्यात याव्यात, याबाबत स्थानिक नगरसेवकांना कळविण्यात आले होते. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन यात्रेपूर्वी समस्या मार्गी लावाव्यात. बंद असलेले पथदीप सुरू करावेत, गटारींची स्वच्छता करावी, पूजासाहित्य व फुले विक्रेत्यांना एका बाजूला थांबण्यास व्यवस्था करून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन मनपाचे प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी स्वीकारून यात्रेपूर्वी समस्या मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बंडू केरवाडकर, उपाध्यक्ष श्रीधर बिर्जे, सचिव किरण पाटील, खजिनदार प्रशांत हणगोजी, विक्रम खंडागळे, भालचंद्र उचगावकर, मंजुनाथ कडोलकर, विनायक अर्कसाली, रमेश कडोलकर यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.