For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीदेवी कोगे व्हेंचर्सच्या प्रमुख आरोपीला अटक

06:55 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्रीदेवी कोगे व्हेंचर्सच्या प्रमुख आरोपीला अटक
Advertisement

माळमारुती पोलिसांची कारवाई : सुमारे 25 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : ठेवीवर अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीदेवी कोगे व्हेंचर्स प्रा. लि. कंपनीशी संबंधित एका आरोपीला यापूर्वीच माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रमुख आरोपी सुबोध व्हनाप्पा कोगे (वय 21) मूळचा रा. जलालपूर ता. रायबाग सध्या रा. महांतेशनगर बेळगाव याला सोमवार दि. 13 रोजी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत सदर कंपनीच्या नावे 254 ठेवीदारांची 25 कोटी 79 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे.

Advertisement

याप्रकरणी प्रवीण चंद्रशेखर दोडमनी रा. केशवनगर धारवाड यांनी 16 जून 2026 रोजी माळमारुती पोलीस स्थानकात श्रीदेवी कोगे व्हेंचर्स प्रा. लि. कंपनीच्या नावे सुबोध व्हनाप्पा कोगे आणि प्रमोद हळ्ळेमनी यांनी आरबीआय, सीबी आणि संबंधित प्राधिकारकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अधिक व्याजदराचे आमिष दाखवून आपल्यासह ठेवीदारांकडून सुमारे 2 कोटी 80 लाख रुपयांची रक्कम ठेवीच्या स्वरुपात ठेवून घेतली आहे. मात्र सदर रक्कम परत न देता फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार माळमारुती पोलिसांनी या प्रकरणी कलम 21 (1), (2), (3), बड्स कायदा 2019 आणि कलम 9 पीपीआयडी कायदा 2004 आणि कलम 318 (4) सहकलम 3 (5), बीएनएस 2023 नुसार गुन्हा दाखल करून घेत तपास हाती घेतला. त्यानुसार 18 जून 2026 रोजी या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रमोद फकिराप्पा हळ्ळेमनी (वय 49) रा. सत्ती ता. अथणी याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

संबंधित आरोपीची चौकशी केली त्यावेळी शहरातील शिवबसवनगर येथील श्रीदेवी कोगे व्हेंचर्स प्रा. लि. कंपनीच्या नावे ठेवीदारांना अधिक व्याजदर देण्याच्या आमिषाने सन 2025 पासून 254 ठेवीदारांकडून 25 कोटी 79 लाख रुपयांची ठेव ठेवून घेऊन ती परत न देता फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुबोध व्हनाप्पा कोगे याला माळमारुती पोलिसांनी सोमवारी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. सदर प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केल्याने न्यायालयाने आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत केली. त्यानुसार पोलिसांनी त्याची कसून चौकशी चालविली आहे.

ठेवीदारांना आवाहन

या प्रकरणातील आरोपींनी ठेवीदारांना आमिष दाखवून घेतलेली रक्कम श्रीदेवी कोगे व्हेंचर्स प्रा. लि. कंपनीच्या नावे ठेवलेली नाही. त्यामुळे ज्या ठेवीदारांनी ठेव ठेवली आहे, त्यांनी आपल्याकडील आवश्यक कागदपत्रांसह माळमारुती पोलीस स्थानकात येऊन चौकशीसाठी हजर रहावे, असे पोलिसांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Advertisement

.