वेस्ट इंडिजची विजयी सलामी
टी 20 वर्ल्डकपमधील पहिली हॅट्ट्रिक : रोमारियो शेफर्डचे हॅट्ट्रिकसह 5 बळी
वृत्तसंस्था/ कोलकाता
येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या टी 20 वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडला 35 धावांनी नमवत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 5 गडी गमावत 182 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा डाव 147 धावांत आटोपला. विंडीजने हा सामना 35 धावांनी जिंकत दोन गुणाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, विंडीजचा स्टार गोलंदाज रोमारिओ शेफर्डने हॅट्ट्रिकसह पाच बळी घेत स्पर्धेतील पहिल्या हॅट्ट्रिकची नोंद केली.
येथील स्कॉटलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ब्रँडन किंग आणि शाय होप या सलामीवीरांनी वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी 8.2 षटकात 54 धावांची भागीदारी रचली. कर्णधार होप 19 धावा करून बाद झाला. ब्रँडन किंग 35 धावा करून माघारी गेला. यानंतर फलंदाजीला आलेल्या शिमरॉन हेटमायरने रोव्हमन पॉवेलला सोबतीला घेत संघाचा डाव सावरला. यावेळी हेटमायरने स्कॉटलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने टी 20 वर्ल्डकपमध्ये विंडीजकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा मान पटकावला. अवघ्या 22 चेंडूत त्याने अर्धशतक साजरे करताना 2009 मधील ख्रिस गेलचा (23 चेंडूत अर्धशतक) विक्रम मोडित काढला. हेटमायरने 36 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारासह 64 धावांची खेळी साकारली. तर पॉवेलने 24 धावा फटकावल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर रुदरफोर्डने 26 धावांचे योगदान दिले. या जोरावर विंडीजने 20 षटकांत 5 बाद 182 धावा केल्या.
स्कॉटलंडच्या पदरी निराशा
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ गडगडला. सलामीवीर मायकल जोन्स 1 धाव करून माघारी परतला. तर जॉर्ज मुंसीने 19 तर ब्रेंडन मॅक्मुलेन अवघ्या 14 धावा करून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रिची बेरिंगटन आणि टॉम ब्रुसने मिळून स्कॉटलंड संघाचा डाव सांभाळला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी साकारली. ही जोडी जमलेली असतानाच रिची बेरिंगटन 42 धावा करुन माघारी परतला. तर इतर फलंदाजांनाही हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे स्कॉटलंडला हा सामना 35 धावांनी गमवावा लागला. स्कॉटलंडचा डाव 18.5 षटकात 147 धावांत आटोपला.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज 20 षटकांत 5 बाद 182 (ब्रँडन किंग 35, हेटमायर 64, पॉवेल 24, रुदरफोर्ड 26, ब्रँड करी 2 बळी, लीस्क, शरीफ आणि डेव्हिडसन प्रत्येकी 1 बळी)
स्कॉटलंड 18.5 षटकांत सर्वबाद 147 (शेफर्ड 20 धावांत 5 बळी, जेसॉन होल्डर 3 बळी, जोसेफ आणि मोती प्रत्येकी 1 बळी).
वर्ल्डकपमधील पहिली हॅट्ट्रिक
स्कॉटलंडविरुद्ध लढतीत 17 व्या षटकात शेफर्डने सलग तीन चेंडूवर क्रॉस (11), लीस्क (0), डेव्हिडसन (0) यांना बाद करत शानदार हॅट्ट्रिक साकारली. शेफर्डने 3 षटकांत अवघ्या 20 धावा देत 5 विकेट घेतले. विशेष म्हणजे, टी 20 वर्ल्डकपच्या इतिहासातील ही दहावी हॅट्ट्रिक ठरली.