लखनौचा हैदराबादवर रोमांचक विजय, 5 गड्यांनी मात
सामनावीर मोहम्मद शमीचा भेदक मारा, पंतचे नाबाद अर्धशतक,
वृत्तसंस्था, हैदराबाद
सामनावीर मोहम्मद शमीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादवर 5 गड्यांनी केवळ एक चेंडू बाकी ठेवत रोमांचक विजय मिळविला. या विजयाने त्यांनी गुणांचे खाते खोलले आहे. दोन सामन्यांतील त्यांचा हा पहिला विजय आहे. फलंदाजीचा सूर गवसलेल्या कर्णधार रिषभ पंतने नाबाद 68 धावांचे योगदान देत विजयात मोलाचे योगदान दिले.
मोहम्मद शमीने कौशल्य आणि दर्जा दाखवत अप्रतिम गोलंदाजी करून निवड समितीचेही लक्ष वेधून घेतले. त्याने तब्बल 18 निर्धाव चेंडू टाकत 9 धावांत 2 बळी मिळविले. त्याला प्रिन्स यादव, अवेश खान यांच्याकडून मोलाची साथ मिळाल्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची स्थिती 4 बाद 26 अशी नाजूक झाली होती. हेन्रिक क्लासेन (41 चेंडूत 62) व नितीशकुमार रे•ाr (33 चेंडू 56) यांनी अर्धशतके नोंदवताना पाचव्या गड्यासाठी 116 धावांची भागीदारी केल्याने हैदराबादला निर्धारित षटकांत 9 बाद 156 धावांची मजल मारता आली. त्यानंतर एडन मार्करम (27 चेंडूत 45) व रिषभ पंत (50 चेंडूत नाबाद 68) यांच्या खेळीमुळे लखनौला एक चेंडू बाकी असताना विजय नोंदवता आला.
अखेरच्या टप्प्यात थोडेसे नाट्या निर्माण झाले होते. शेवटच्या षटकात 9 धावांची गरज असताना पंतने उनाडकटला दोन चौकार ठोकत सामना संपवला. यातील पहिला चौकार टेनिसमधील फोरहँडसारखा फटका मारत नोंदवला तर दुसरा मिडॉफवरून उंचावरून फटका मारत नोंदवला होता. पंतच्या खेळीत 9 चौकारांचा समावेश होता. हैदराबादचे स्पिनर्स हर्ष दुबे व शिवांग कुमार यांनी अप्रतिम गोलंदाजी केल्यामुळे पंतने संथ खेळपट्टीवर फटक्यांची योग्य निवड केली.
शमीचा भेदक मारा
सामन्याच्या सुरुवातीला मात्र शमीने दर्जेदार गोलंदाजी करीत पॉवरप्लेमध्येच लखनौला वरचश्मा मिळवून दिला. त्याने अभिषेक शर्माला शून्यावर व त्याचा सहकारी ट्रॅव्हिस हेडला 7 धावांवर बाद केले. लागोपाठच्या चेंडूवर दोघे बाद झाले. प्रिन्स यादवने शमीला चांगली साथ देताना दोन बळी टिपले. त्याने एका अप्रतिम इनस्विंगरवर बहरात असलेल्या कर्णधार इशान किशनला एका धावेवर त्रिफळाचीत केले. 4 बाद 26 अशी हैदराबादची स्थिती झाली तेव्हा ते शंभरी गाठतील का, अशी शंका निर्माण झाली होती. क्लासेन व नितीश रे•ाr यांनी लखनौच्या गोलंदाजांवर प्रतिआक्रमण करीत पाचव्या गड्यासाठी 116 धावांची भागीदारी करीत संघाला बऱ्यापैकी सुस्थिती प्राप्त करून दिली. पण ही जोडी फुटल्यानंतर हैदराबादचा डाव पुन्हा एका कोलमडला आणि 20 षटकाअखेर 9 बाद 156 अशी दीडशतकी मजल मारता आली. दिग्वेश राठीने पहिल्या 2 षटकांत 10 धावा दिल्या होत्या. पण नंतरच्या दोन षटकांत तब्बल 36 धावा हैदराबादने वसूल केल्या.
