For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राम मंदिर ध्वजारोहणाचा मुहूर्त निश्चित

06:23 AM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
राम मंदिर ध्वजारोहणाचा मुहूर्त निश्चित
Advertisement

8 हजार विशिष्ट अतिथी होणार सामील : मोबाइल फोन आणण्यास मनाई

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

अयोध्येतील राम मंदिरात 25 नोव्हेंबर रोजी होणारा ध्वजारोहण सोहळा राष्ट्रीय  सोहळ्याच्या प्रतिष्ठेसह पार पडणार आहे. वैदिका परंपरा आणि आधुनिक शिष्टाचारादरम्यान सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 1.30 वाजेपर्यंत निर्धारित शुभ मुहूर्तामध्ये ध्वजारोहणाचा विधी संपन्न केला जाणार आहे. याच कालावधीच्या आत निवडण्यात आलेल्या 30 मिनिटांच्या श्रेष्ठ मुहूर्तात ध्वज फडकविला जाईल. हा मुहूर्त दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवन स्वातंत्र्यदिनाच्या अनुरुपच ध्वज फडकविण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. ध्वजाला वैदिक मंत्रोच्चारादरम्यान मानवंदना दिली जाणार आहे. शंखनदा, ढोल आणि मंगल वाद्यांचा ध्वनी पूर्ण परिसरात निनादणार आहे. ध्वज फडकताच मंदिर परिसरातील घंटा अन् ढोल वाजू लागतील.

Advertisement

राष्ट्रीय उत्सवांप्रमाणेच या सोहळ्याला शिष्टाचारासह आयोजित केले जाणार आहे. ध्वजारोहणाची पूर्ण प्रक्रिया सैन्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्ण केली जाईल. परिसराला पारंपरिक ध्वज, पुष्प आणि दीपांनी सजविले जात आहे. शहरात सुरक्षा, वाहतूक आणि अतिथींच्या सुविधेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

पंतप्रधानांचा रोड शो शक्य

राम मंदिराच्या ध्वजारोहण सोहळ्यात 25 नोव्हेंबर रोजी आगमनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत रोड शो देखील करू शकतात. पंतप्रधान मोदींच्या विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा मार्ग एसपीजीकडून निश्चित करण्यात येणार आहे. मोदींच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यायी स्वरुपात दोन मार्ग निश्चित केले आहेत. पहिला मार्ग विमानतळ ते महोबरा बाजारमार्गे राम मंदिरापर्यंत रस्तेमार्गाने जाण्याचा असून हा सुमारे 12 किलोमीटर लांब आहे. दुसऱ्या पर्यायाच्या स्वरुपात विमानतळावरून हेलिकॉप्टरने साकेत कॉलेजमधील हेलिपॅडवर उतरून राम मंदिरापर्यंत जाणे प्रस्तावित करण्यात आले आहे. हा मार्ग केवळ एक किलोमीटर लांब आहे. या दोन्ही मार्गांवर पंतप्रधानांच्या संभाव्य प्रवासाविषयी सुरक्षा आणि अन्य व्यवस्थेशी निगडित तयारी केली जात आहे.

मुख्यमंत्री योगी करणार समीक्षा

25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या ध्वजारोहण आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या दौऱ्यावर येऊ शकतात. अयोध्येतील प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री योगी समीक्षा बैठक घेऊ शकतात. ही बैठक रामजन्मभूमी परिसरात होणार आहे. बैठकीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधीही सामील होणार आहेत. यादरम्यान योगींकडून राम मंदिर परिसरात ध्वजारोहण सोहळ्याशी निगडित कार्यक्रमस्थळांची पाहणी केली जाणार आहे. पंतप्रधान आणि सरसंघचालकांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्याच्या  रुपरेषेवरून योगी आदित्यनाथ यांच्याकडून निर्देश दिले जाणार आहेत.

मोबाइल नेण्यास मनाई

राम मंदिरात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करत ट्रस्ट आणि प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ध्वजारोहण सोहळ्यात येणाऱ्या कुठल्याही अतिथीला मोबाइल फोनसह मंदिर परिसरात प्रवेशाची अनुमती दिली जाणार नाही. दिल्लीतील स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढविण्याच सूचना केल्याने ट्रस्ट आणि प्रशासनाने मोबाइलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

महनीय अतिथींची उपस्थिती

25 नोव्हेंबर रोजी राम मंदिरात ध्वजारोहण सोहळा आयोजित होणार असून यात पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल समवेत 8 हजार अतिथी सामील होतील. आमंत्रण पत्रिकेत 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत मंदिरात प्रवेश करण्याची सूचना करण्यात आली आहे. परिसरातच अतिथींचे भोजन अन् न्याहरीची व्यवस्था ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. राम जन्मभूमी परिसरात अतिरिक्त मेटल डिटेक्टर, श्वान पथक आणि देखरेख वाढविण्यात आली आहे.

Advertisement

.