रातकिड्यांचा ध्वनी कानाला घातक !
रात्रीच्या वेळी रातकिड्यांचा ध्वनी आपल्या कानावर वर्षानुवर्षांपासून पडत येत आहे. ‘झीं...झीं...’ असा हा वेशिष्ट पद्धतीचा लयदार ध्वनी कित्येकांना आवडतोही. तथापि, हा ध्वनी सारखा कानावर पडल्यास आपल्या कानांना विकार होऊ शकतो आणि श्रवणशक्ती कमी होऊ शकते. निदान चीनमधील काही विद्यार्थ्यांना असा अनुभव आला आहे. त्यामुळे रातकिड्यांचा ध्वनी अधिक काळ ऐकावा की ऐकू नये, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे चीनी विद्यार्थी एका वनविभागात सहलीला गेले होते. तेथे एका विद्यार्थ्याने सलग चार तास रातकिड्यांचा ध्वनी ऐकला. वनांमध्ये अन्य कोणता ध्वनी नसल्याने रातकिड्यांचा ध्वनी मोठा होता. तो सतत चार तास ऐकल्याने त्या विद्यार्थ्याचे कान बिघडले आणि त्याला ऐकू येईनासे झाले, असे त्याने स्वत: स्पष्ट केले आहे. संध्याकाळनंतर त्याच्या कानांमध्ये रातकिड्यांचाच ध्वनी घुमू लागला आणि त्याला मोबाईलची घंटा, पक्ष्यांचा किलबिलाट किंवा अन्य कोणते ध्वनी ऐकू येईनासे झाले. त्यामुळे तो चिंतेत पडला.
अखेर सहलीहून परतल्यानंतर त्याच्यावर दोन आठवडे वैद्यकीय उपचार करण्यात आले. उपचार आणि विश्रांती यामुळे त्याची श्रवणशक्ती परत आली. तथापि. रातडिक्यांच्या ध्वनीमुळे कान बिघडू शकतात, हा नवा शोध आता लागला आहे. त्यामुळे रातकिडे आणि त्यांचा निरुपद्रवी वाटणारा ध्वनी यांच्यासंबंधी नव्याने चर्चेला प्रारंभ झाला आहे. अनेक डॉक्टरांनीही आता या घटनेवर त्यांची मते प्रदर्शित केली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार एखाद-दुसऱ्या रातकिड्याच्या ध्वनीमुळे कानांवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तथापि, माणसाने हजारो रातकिड्यांचा ध्वनी बराच वेळ ऐकला, तर मात्र तो कानांना असह्या होतो आणि श्रवणशक्ती कमी होऊ शकते. रातकिड्यांचा ध्वनी हा फार मोठा असल्याचे जाणवत नाही. तथापि, तो अपायकारक असू शकतो, असे मत व्यक्त होत आहे. हा ध्वनी अधिक काळ ऐकल्यास त्वरित उपचार केले जाण्याची आवश्यकता असते. वेळेत ते झाल्यास कान पुन्हा योग्य प्रकारे काम करु लागतात. उपचारांना अधिक विलंब लागल्यास तुम्हाला श्रवणशक्ती कायमची गमवावी लागू शकते. त्यामुळे निर्मनुष्य स्थळी झोपण्याची वेळ आल्यास कानांना संरक्षण दिले पाहिजे.