राज्यात चारही जागांवर ‘भाजप-निजद’ची सरशी
विधानपरिषद निवडणूक निकाल : काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :
कर्नाटक विधान परिषदेच्या दोन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजप-निजद युतीने दणदणीत विजय मिळवला आहे. सर्व चार जागा जिंकून युतीच्या उमेदवारांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. हा निकाल आगामी निवडणुकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे मत भाजप आणि निजद पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.
तिन्ही राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. निवडणुकीतील या विजयामुळे युतीमधील नेत्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. निकाल जाहीर होताच भाजप आणि निजद कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणा देऊन आनंद साजरा केला. 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत बेंगळूर शिक्षक मतदारसंघातून निजदचे ए. पी. रंगनाथ विजयी झाले, तर ईशान्य शिक्षक मतदारसंघातून भाजपचे शशील जी. नमोशी विजयी झाले. पदवीधर मतदारसंघांपैकी पश्चिम मतदारसंघातून भाजपचे एस. व्ही. संकनूर आणि आग्नेय मतदारसंघातून भाजपचे के. एम. सुरेश विजयी झाले आहेत.
बेंगळूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत निजदच्या ए. पी. रंगनाथ यांनी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य पुट्टण्णा यांचा दारुण पराभव केला. रंगनाथ यांना 10,810 मते मिळाली, तर पुट्टण्णा यांना 9,902 मते मिळाली. अशा प्रकारे रंगनाथ 908 मतांच्या फरकाने विजयी झाले. या निवडणुकीत एकूण 27,405 पात्र मतदारांपैकी 22,468 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
ईशान्य शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि विद्यमान विधान परिषद सदस्य शशिल नमोशी विजयी झाले. नमोशी यांनी काँग्रेसचे उमेदवार शरणप्पा मट्टूर यांना पराभवाचा धक्का दिला. शशिल नमोशी यांना 15,596 मते मिळाली, तर शरणप्पा मट्टूर यांना 12,299 मते मिळाली. अशा प्रकारे, नमोशी हे 3,297 मतांच्या फरकाने विजयी झाले.
संकनूर यांची ‘हॅट्ट्रिक’
विधानपरिषदेच्या पश्चिम पदवीधर मतदारसंघात, भाजपचे उमेदवार एस. व्ही. संकनूर यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली. धारवाड येथील कृषी विज्ञान विद्यापीठात झालेल्या मतमोजणीदरम्यान, सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या संकनूर यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आपले वर्चस्व कायम राखले. एकूण मतांचा विचार करता, संकनूर यांना 33,711 मते मिळाली, तर काँग्रेसचे परभूत उमेदवार मोहन लिंबिकाई यांना 24,388 मते मिळाली. पश्चिम पदवीधर मतदारसंघातील हा निकाल भाजपसाठी आणखी एक मोठा विजय ठरला आहे.
‘आग्नेय पदवीधर’मध्ये 20,076 मते बाद
आग्नेय पदवीधर मतदारसंघातही भाजपचे उमेदवार के. एम. सुरेश यांनी काँग्रेसचे उमेदवार शशी हुलिकुंटेमठ यांचा पराभव केला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत सुरेश यांनी काँग्रेस उमेदवाराचा सुमारे 23,098 मत फरकाने पराभव केला. सुरेश यांना 66,020 मते मिळाली, तर शशी हुलिकुंटेमठ यांना 42,922 मते मिळाली. एकूण 20,076 मते बाद ठरवण्यात आली. मंगळवारी सुरू झालेली मतमोजणी बुधवारी सकाळी पूर्ण झाली. एकूण 10 फेऱ्यांपर्यंत मतमोजणी झाली.
एकूणच, विधान परिषदेच्या चार मतदारसंघांतील निवडणुकीत भाजप-निजद युतीच्या उमेदवारांच्या विजयामुळे रालोआची राजकीय ताकद वाढली आहे.
सत्यमेव जयते : कुमारस्वामी
केंद्रीय मंत्री आणि निजदचे वरिष्ठ नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, ‘सत्यमेव जयते’ असे नमूद केले आहे. विधान परिषद निवडणुकीत असत्य, गैरकारभार, पैशांची ताकद आणि सत्तेच्या बळाचा दुरुपयोग यांचा पराभव झाला आहे, असे म्हटले आहे.
2028 च्या निवडणुकांसाठी दिशादर्शक
राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत युतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. याद्वारे राज्य आणि देशाला दूषित करू पाहणाऱ्या क्षुद्र राजकीय व्यवस्थेला मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यातील मतदारांनी सत्तेवर असलेल्या भ्रष्ट आणि विकासशून्य असलेल्या काँग्रेसला नाकारले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिली आहे.
दोन जागा जिंकण्याची अपेक्षा होती, पण....
विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या संदेशाचा आम्ही सखोल अभ्यास करून आवश्यक त्या सुधारणात्मक उपाययोजना केल्या जातील. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. आम्हाला दोन जागा जिंकण्याची अपेक्षा होती, परंतु तसे घडले नाही. आमच्या पक्षाचे उमेदवार पराभूत झाले असले तरी, आम्हाला लक्षणीय मते मिळाली आहेत. बेंगळूर शिक्षक मतदारसंघातील निकाल अनपेक्षित होता.
- डी. के. शिवकुमार, मुख्यमंत्री
