For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यातील धरणामध्ये मुबलक जलसाठा

07:42 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यातील धरणामध्ये  मुबलक जलसाठा
Advertisement

जलस्रोत मुख्य अभियंत्यांची माहिती

Advertisement

त.भा. विशेष प्रतिनिधी

पणजी : सध्या पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी सर्व धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. पुन्हा पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर धरणांमध्ये पाण्याची आवक पुन्हा सुरू होईल, अशी माहिती जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर यांनी दिली. वर्षभरात गोव्यात नव्याने शंभर बंधारे उभारण्याची सरकारची योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

गेले पाच दिवस राज्यातून पाऊस गायब झाला आहे. जूनमध्ये सुऊवातीपासून तीन आठवडे पाऊस पडला नाही. त्यामुळे पाण्याचे काय होणार? असे वाटत होते. प्रत्यक्षात जूनच्या अखेरच्या आठवड्यात जोरदार पाऊस सुरू झाला आणि जुलैचा पहिला आठवडा मुसळधार पाऊस झाला. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणात दैनंदिन येणारी पाण्याची आवक एकदमच कमी झाली आहे. मात्र अद्याप चिंता निर्माण झालेली नाही. कारण अजूनही पावसाचे दोन महिने आहेत. गोव्यात पाऊस अजूनही पडायचा आहे आणि त्यामुळेच धरणांमध्ये देखील पाणीसाठा वाढत जाईल.

तथापि नागरिकांनी पाण्याचा वापर पाहिजे तेवढाच करणे योग्य ठरेल, असे सांगून सालेलकर म्हणाले, पुढील वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. गोव्यात नव्याने शंभर बंधारे उभारण्याची जलस्रोत खात्याची योजना आहे. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी तशी योजना आखलेली आहे. आतापर्यंत दहा ते बारा बंधारे मंजूर झालेले आहेत. पावसाळ्याच्यानंतर त्यांचे काम सुरू होईल. या व्यतिरिक्त धरणामध्ये साचलेला गाळ देखील उपसण्याचे काम हाती घेतले जाईल. जसजशी पाण्याची पातळी उन्हाळ्यात कमी होईल, त्यानुसार गाळ उपसण्याचे काम सुरू होईल. यासाठी धरण प्राधिकरणाकडून परवानगी आवश्यक असते. एक-दोन धरणांसाठी मिळालेली असून इतर धरणांकरिता तशी परवानगी मिळाल्यानंतर सुरक्षेचे सर्व उपाय हाती घेऊन नंतरच धरणातील गाळ काढला जाईल. धरणातील गाळ काढल्यानंतर जास्त प्रमाणात तिथे पाणी राहील. मात्र गाळ काढताना त्याचा धरणावर परिणाम होऊ नये यासाठी फार काळजी घ्यावी लागते.

सध्याच्या परिस्थितीमध्ये धरणामध्ये पाणीसाठा चांगला आहे. साळावलीमध्ये 48 टक्के तर अंजुणे धरणामध्ये 24 टक्के जलसाठा आहे. अद्याप पाऊस पडायचा बाकी आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असेही सालेलकर यांनी सांगितले

Advertisement
Tags :

.