मोठ्या पडद्यावर परतणार रॉकी
सिल्वेस्टर स्टेलोनच्या संघर्षाची कहाणी दिसणार
1976 मध्ये हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सिल्वेस्टर स्टेलोनचा चित्रपट ‘रॉकी’ प्रदर्शित झाला होता. स्पोर्ट्स ड्रामा बायोपिक फिल्मद्वारे स्टेलोन यांनी चित्रपटाची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकली होती आणि तेथूनच कल्ट फिल्म फ्रेंचाइजी रॉकीची सुरुवात झाली. आता सिल्वेस्टर स्टेलॉन यांच्याकडून रॉकी निर्माण करण्याच्या खऱ्या संघर्षाची कहाणी चित्रपट ‘प्ले रॉकी’मध्ये पाहता येणार आहे, यात अभिनेता एंथनी इप्पोलिटो हा स्टेलोनच्या व्यक्तिरेखेत दिसून येईल.
प्ले रॉकीचा ट्रेलर निर्मात्यांनी जारी केला आहे. हा हॉलिवूडचा आगामी बायोग्राफिकल ड्रामापट असून तो रॉकीची निर्मिती आणि स्टेलोन यांच्या संघर्षाच्या खऱ्या कहाणीवर आधारित असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन पीटर फॅलरी यांनी केले आहे. सिल्वेस्टर स्टेलोन यांची चालण्याची सवय, बोलण्याची पद्धत आणि बॉक्सिंग पद्धत प्रत्येक गोष्ट एंथनी इप्पोलिटोने अत्यंत सक्षमपणे दाखवून दिली आहे. चित्रपटासाठी दिग्दर्शक पीटर फॅलरी यांनी अत्यंत परिपूर्ण कास्टिंग केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. एंथनीने यापूर्वी पिक्सल्स, ग्रँड आर्मी आणि द ऑफर यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.