मोदी मंत्रिमंडळाचा मास्टरस्ट्रोक!
एकाचवेळी 4,703 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी : गुजरात-आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा ऐतिहासिक 12 वर्षांचा कार्यकाळ 10 जून, 2026 रोजी पूर्ण होत असतानाच बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाची पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाने एकूण 4,703 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. हे प्रकल्प प्रामुख्याने गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या विकासावर केंद्रित आहेत. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक संदेश शेअर करत यासंबंधीची माहिती दिली.
मंत्रिमंडळाने अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज 2ए अंतर्गत 6 किलोमीटरच्या नवीन कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामध्ये पाच नवीन स्थानकांच्या बांधकामाचा समावेश असेल. या विस्तार प्रकल्पासाठी अंदाजे 2,169 कोटी खर्च अपेक्षित असून, यामुळे सुमारे 2,500 लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या टप्प्याच्या पूर्ततेमुळे अहमदाबाद-गांधीनगर मेट्रो मार्गाची एकूण लांबी 77.63 किलोमीटर होईल, अशी माहिती देण्यात आली.
अमरावतीमध्ये 2,500 कोटींहून अधिक रुपयांचे प्रकल्प
केंद्र सरकारने आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावतीमध्ये दोन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा केली आहे. केंद्रीय सरकारी कार्यालयीन संकुल उभारण्यासाठी 1,299 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून 23.25 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर एक सरकारी कार्यालय संकुल बांधले जाईल. तसेच 31.30 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर 1,235 कोटी रुपये खर्च करून स्वतंत्रपणे एक सरकारी निवासी संकुलही बांधले जाणार असल्याचे सांगण्यात आले
पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा
कॅबिनेट ब्रीफिंगदरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. देशाचे नेतृत्व संवेदनशीलता, संयम, प्रामाणिकपणा आणि निर्णायकता असलेल्या सक्षम हातात आहे. सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या आणि आपल्या कार्याद्वारे देशाला पुढे नेणाऱ्यांवर देशाने विश्वास ठेवला आहे, असे वैष्णव म्हणाले. याव्यतिरिक्त सरकारने 2028 पर्यंत यमुना स्वच्छ करण्याच्या उद्दिष्टाप्रती आणि ग्रेट निकोबारसारख्या धोरणात्मक प्रकल्पांप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.