मानसिक कणखरतेमुळे नेमबाज मोदगिलला ऑलिम्पिकमध्ये संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या वर्षीच्या आशियाई क्रीडास्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर छळू लागलेल्या मानसिक समस्येवर केलेली मात ही बाब नेमबाज अंजुम मोदगिलला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्याच्या बाबतीत महत्त्वाची ठरलेली आहे.
माजी जागतिक अव्वल क्रमांकाची खेळाडू असलेली मोदगिल जागतिक विजेती आणि राष्ट्रकुल खेळांतील पदकविजेती राहिलेली असून टोकियो येथे झालेल्या मागील ऑलिम्पिकमधील दोन स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला होता. तिने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये 15 वे आणि 10 मीटर एअर रायफलमध्ये 18 वे स्थान पटकावले होते. परंतु पॅरिसमध्ये ती केवळ महिलांच्या 50 मीटर 3 पोझिशनमध्ये सहभागी होणार आहे.
तिच्या स्वत:च दिलेल्या कबुलीनुसार, खराब फॉर्ममुळे जागतिक आणि आशियाई क्रीडास्पर्धेसाठीच्या भारतीय संघातून झालेली हकालपट्टी तिच्यासाठी डोळे उघडणारी ठरली. त्यानंतर या 30 वर्षीय तऊणीने तिच्या प्रशिक्षणावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्याव्यतिरिक्त आपली मानसिक कणखरता सुधारण्यासाठी काम केले. ‘टोकियोनंतरची तीन वर्षे ही माझ्यासाठी उलथापालथ करणारी होती. मी कठीण काळ पाहिला आहे, पण मला आणखी मजबूतरीत्या पुनरागमन करायचे होते. पॅरिसमध्ये टोकियोचे अनुभव नक्कीच उपयुक्त ठरतील’, असे मोदगिलने आभासी पद्धतीने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
‘मी खरोखरच कोटा आणि चाचण्यांचा फायदा घेतला. फेडरेशनने मला आशा गमावू नकोस असे सांगितले होते. माझी परिस्थिती काय आहे ते त्यांना समजले. मी चाचण्यांमध्ये केवळ 2 गुणांमुळे जागतिक स्पर्धा आणि आशियाई क्रीडास्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळवू शकले नसले, तरी यावेळी मला खरोखरच संघात प्रवेश मिळण्याचा विश्वास होता. चाचण्यांमध्ये सर्वोत्तम प्रयत्न करण्यासाठी मी खूप लक्ष केंद्रीत केले होते आणि मी सकारात्मक होते. मला माझी ताकद आणि दबावाखाली कसे काम करावे हे माहीत होते. त्याचे फळ मिळाले’, असे मोदगिलने यावेळी सांगितले.
‘टोकियो ऑलिम्पिकनंतर एका वर्षाने मी विश्वचषकात दोन पदके जिंकली आणि जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळविला. मी मानसिक प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत केले. हे माझ्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरले. मी अधिक चांगले होण्यासाठी आणि माझ्यासाठी काय चांगले आहे ते शोधण्यासाठी वेळेचा उपयोग केला’, असे ती पुढे म्हणाली. पॅरिस गेम्ससाठी भारताने 21 सदस्यीय नेमबाजी दलाची नियुक्ती केली आहे, ज्यामध्ये 22 वर्षीय सिफ्ट कौर साम्राचाही समावेश आहे. साम्रा 50 मीटर 3 पोझिशन स्पर्धेत मोदगिलसोबत भाग घेणार आहे.