महापालिका आयुक्तांवर अवमानीचा खटला चालवावा
अॅड. अशोक पुजारी यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
जन्म-मृत्यू दाखल्यामध्ये दुरुस्ती करून देण्यास महापालिका आयुक्त दुर्लक्ष करीत असून याची चौकशी करून आयुक्तांवर अवमानीचा खटला चालवावा, अशी मागणी अॅड. अशोक टी. पुजारी, डॉलर्स कॉलनी, बेळगाव यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य नायाधीशांकडे (बेंगळूर) केली आहे.
नावात बदल, पत्त्यामध्ये बदल, जन्म तारखेत दुरुस्ती अशी कामे महापालिकेकडून होत असतात. उच्च न्यायालयाचा आदेशही आहे. जन्म-मृत्यू संबंधिचे प्रमाणपत्र देणारे अधिकारी महापालिकेत कार्यरत असतात. महापालिका आयुक्तांकडे जन्म-मृत्यू दाखल्यात दुरुस्ती करून घेण्यासाठी अनेकदा मागणी केली तरी त्यांनी न्यायालयाचा आदेश धुडकावून लावत आदेश आम्हाला लागू होत नाही असे सांगत आहेत. जन्म-मृत्यू दाखल्यात दुरुस्ती करून देण्यासाठी सादर केलेले अर्ज फेटाळून लावत आहेत. यामुळे नागरिकांनी न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायाधिशांनी याप्रकरणाची त्वरित दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अॅड. पुजारी यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.