For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महागाईचा आणखी एक झटका! दूधाच्या दरात 9 रुपयांची वाढ; प्रतिलिटर दर 102 रुपयांवर

04:50 PM Aug 29, 2026 IST | YOGESH KANGUDE
महागाईचा आणखी एक झटका  दूधाच्या दरात 9 रुपयांची वाढ  प्रतिलिटर दर 102 रुपयांवर
Advertisement

मुंबई : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरखर्चाचे गणित बिघडले असतानाच आता दूधाच्या दरवाढीचा आणखी एक मोठा फटका बसणार आहे. थेट डेअरी फार्म किंवा गोठ्यातून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या ताज्या म्हशीच्या दूधाच्या दरात प्रतिलिटर 9 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दूधाचा दर शंभरीपार जाणार असून, प्रतिलिटर 102 रुपये मोजावे लागणार आहेत.

Advertisement

बॉम्बे मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनने (BMPA) दूधाच्या घाऊक दरात ही वाढ जाहीर केली आहे. नवीन दर 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होणार असून,28 फेब्रुवारी 2027 पर्यंत हे दर कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सध्या दूधाचा घाऊक दर प्रतिलिटर 93रुपये आहे. त्यात 9 रुपयांची वाढ झाल्यानंतर हा दर थेट 102 रुपयांवर पोहोचणार आहे. या दरवाढीचा परिणाम स्थानिक डेअरी, दूध विक्रेते तसेच थेट ग्राहकांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील दूधाचे दरही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

उत्पादन खर्च वाढल्याचा परिणाम

दूध उत्पादकांच्या वाढत्या खर्चामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पशुखाद्य, चारा, धान्य, वाहतूक, जनावरांची देखभाल आणि इतर खर्चात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढल्याने उत्पादकांवर आर्थिक दबाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, दूधाच्या दरवाढीचा परिणाम केवळ दूधापुरता मर्यादित राहण्याची शक्यता नाही. दही, पनीर, मिठाई, चहा तसेच विविध दुग्धजन्य पदार्थांच्या किमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. आगामी सणासुदीच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असताना ही दरवाढ ग्राहकांच्या बजेटवर अतिरिक्त भार टाकणारी ठरणार आहे.

आधीच अन्नधान्य, भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिक त्रस्त असताना आता दूधाचे दरही शंभरीपार जाणार असल्याने सर्वसामान्यांच्या रोजच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे.

Advertisement
Tags :

.