मध्यप्रदेश शासनाकडून बक्षीसांची घोषणा
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांचा खास गौरव
वृत्तसंस्था, भोपाळ
सध्या सुरू असलेल्या 2026 च्या ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारे यामिनी आणि अजय बाबू यांचा मध्यप्रदेश शासनातर्फे खास गौरव करण्यात येणार आहे. तसेच मध्यप्रदेश शासनातर्फे या पदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस आणि शासकीय नोकरीची घोषणा करण्यात आली आहे.
शनिवारी मध्यप्रदेश शासनाच्या बैठकीमध्ये राज्याचे क्रीडा युवजन खात्याचे मंत्री विश्वास कैलास सारंग यांनी मध्यप्रदेशचे खेळाडू यामिनी आणि अजय बाबू यांनी अनुक्रमे ज्युडो आणि वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदके मिळविल्याबद्दल खास गौरव केला आहे. यामिनी आणि अजय बाबू यांच्या या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. क्रीडा युवजन खात्याच्या मंत्र्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे यामिनी आणि अजय बाबू यांचे खास अभिनंदन केले आहे.
मध्यप्रदेश शासनाकडून क्रीडा क्षेत्राला अधिक चालना देण्याची योजना यापूर्वीच आखण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारात खेळाडू तयार करण्यासाठी शासनाचे यापुढे सातत्याने प्रयत्न राहतील, असे मध्यप्रमेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले. राज्यातील क्रीडापटूंकरिता आधुनिक सुविधा तसेच सुसज्ज क्रीडा साहित्य आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शासनातर्फे सातत्याने करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.