मध्यपूर्वेतून काही भारतीय सुखरुप परत
वाढली युद्धाची व्याप्ती, इस्रालयचे लेबेनॉनवर हल्ले : आणखी 15 दिवस युद्ध करण्याची अमेरिकेची सज्जता, इस्रायलही सज्ज
तेल अवीव, तेहरान
मध्यपूर्वेतील युद्धाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. इस्रायलने मंगळवारी लेबेनॉनमध्ये जोरदार वायुहल्ले चढविले आहेत. तर इराणने कुवेत, बहारिन आणि दुबईला पुन्हा लक्ष्य केले आहे. भारताने आपले नागरिक परत आणण्यास प्रारंभ केला असून 149 भारतीय दुबईहून परत भारतात आले आहे. त्यांनी त्यांचे थरारक अनुभव कथन केले. इस्रायलने मंगळवारी दुपारी इराणच्या राजधानीवर पुन्हा क्षेपणास्त्रांचा वर्षाव करून या शहराचा काही भाग उद्ध्वस्त केला आहे. इराणच्या सर्वात मोठ्या अणुकेंद्रावरही हल्ले करण्यात आले असून तेथे मोठी हानी झाली.
इराणवर हल्ल्यांची मोठी लाट लवकरच येऊन कोसळणार आहे, असे भाकित अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ते व्हाईट हाऊस येथून युद्धासंबंधी माहिती देत होते. इराणची युद्ध क्षमता पूर्ण नष्ट करणे, हा अमेरिकेचा प्रमुख हेतू आहे. हे युद्ध कितीकाळ चालेल हे आताच सांगता येणार नाही, असे प्रतिपादन ट्रम्प यांनी केल्याने युद्धाची व्याप्ती आणखी वाढणार, अशी शंका निर्माण झाली आहे.
युएई प्रतिकारासाठी सज्ज
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी आमच्याकडे पुरेशा प्रमाणात साधनसामग्री असून आम्ही इराणची अनेक क्षेपणास्त्रे निकामी केली आहेत. आमची यंत्रणा अत्याधुनिक आहे. आमच्याकडे दारुगोळा आणि भक्कम अशी क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा सज्ज आहे, असे प्रतिपादन संयुक्त अरब अमिरातीने केले.
इस्रायलचा राजप्रासादावर हल्ला
इस्रायलने मंगळवारी इराणच्या राजप्रासादाच्या कार्यालयावर जोरदार वायुहल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये कार्यालय आणि राजप्रासादाचा काही भाग नष्ट झाला. या प्रासादात क्षेपणास्त्र नियंत्रण यंत्रणा असल्याने त्याला लक्ष्य करण्यात आले, असे प्रतिपादन इस्रायलच्या संरक्षण विभागाने केले आहे.
कतारने थांबविले युरिया उत्पादन
कतार या देशाच्या ‘करात एनर्जी’ या कंपनीने युरिया, मेंथॉल आणि पॉलिमर्स यांचे उत्पादन थांबविले आहे. कतारवर इराण वारंवार हल्ले करीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा यासाठी या पदार्थांची उत्पादने पुढचा काही काळ थांबविण्यात येणार आहेत, अशी माहिती या कंपनीने दिली आहे.
चर्चेला राजी, पण उशीर
अमेरिकेशी चर्चा करण्यास आमची संमती आहे, असे इराणच्या नव्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, आमचा योग्य तो सन्मान राखण्यात आला पाहिजे, असे प्रतिपादनही केले. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विशिष्ट प्रमाणात सहमती झाल्याशिवाय चर्चा करणार नाही, अशी भूमिका घेतली. आम्ही इराणला वारंवार चर्चेच्या टेबलवर बोलावित होतो. तथापि, त्यावेळी आमची विनंती नाकारण्यात आली. आता उशीर झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
अमेरिकेची चार उद्दिष्ट्यो
या युद्धात अमेरिकेने चार उद्दिष्ट्यो समोर ठेवली आहेत, अशी माहिती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. 1) इराणची क्षेपणास्त्र निर्मिती करण्याची क्षमता आणि क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्याची क्षमता पूर्णत: नष्ट करणे 2) इराणचे नौदल पूर्णत: संपविणे 3) इराणच्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षेचा नायनाट करणे आणि 4) जगातील दहशतवादी गटांना साहाय्य करण्यापासून इराणला थांबविणे, हे चार प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इराणनेही अमेरिकेला धमकी दिली आहे.
इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार
इराणचे नवे संरक्षण मंत्री मजीद इब्न अल रेझा हे देखील इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ठार झाले आहेत, अशी माहिती इस्रायलने दिली आहे. रेझा हे प्रवास करत असताना त्यांना टिपण्यात आले. गुप्तचरांनी त्यांचा नेमका ठावठिकाणा स्पष्ट केल्याने त्यांना टिपणे शक्य झाले, असे मंगळवारी संध्याकाळी स्पष्ट केले गेले.
व्यापारी नौकांवर हल्ल्याचा निषेध
इराणच्या आखातात व्यापारी नौकांवर इराणकडून हल्ले केले जात आहेत. भारताने या कृतीचा निषेध केला आहे. व्यापारी नौकांवर हल्ले केल्याने जगाची अर्थव्यवस्था डळमळीत होईल. इराणलाही याचा कोणताही लाभ होणार नाही. व्यापारी नौकांवर हल्ले करणे, हा सरळसरळ आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग आहे. हे हल्ले त्वरित थांबविण्यात यावेत, असे आवाहन भारताने इराणला केले आहे.
इस्रायलचे लेबेनॉनवर हल्ले
इस्रायलने मंगळवारीही शेजारच्या लेबेनॉन देशावर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागली. तसेच युद्ध विमानांमधून बॉम्बफेकही केली. लेबेनॉनमध्ये इराण पुरस्कृत हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचे केंद्र आहे. त्याच्यावर जोरदार हल्ले चढविण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये किमात 50 हिजबुल्ला हस्तक मारले गेल्याची माहिती देण्यात आली. पण या माहितीला अधिकृत दुजोरा अद्याप देण्यात आलेला नाही.
कतारचा इराणला इशारा
मध्यपूर्वेतील तर छोट्या देशांवर हल्ले करून त्यांनाही युद्धात ओढण्याचा प्रयत्न इराण करीत आहे. मात्र, हे त्यांचे धोरण त्याच्याच अंगलट येईल. आखाती देशांवर दबाव टाकून या युद्धाचा अंत होणार नाही. उलट, शांततामय मार्गाने तोडगा काढण्याच्या प्रयत्नांमध्ये इराणच्या या कृतीमुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे, याची जाणीव त्या देशाने ठेवली पाहिजे, असा स्पष्ट इशारा कतार देशाने दिला.
सौदी अरेबियाकडूनही निषेध
इराणने मंगळवारी सौदी अरेबियातील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केला होता. या हल्ल्यात दूतावासाची हानी झाली होती. सौदी अरेबियाने या हल्ल्याचा निषेध केला असून अशा धोरणामुळे युद्ध चिघळण्याची शक्यता व्यक्त केली. इराणने अन्य देशांना लक्ष्य करणे थांबविले पाहिजे, असे या देशाचे म्हणणे आहे.
इराणने मागितला पाठिंबा
अमेरिकेशी युद्ध करण्यास इराण सज्ज आहे. मात्र, आखाती देशांनी इराणला पाठिंबा द्यावा. इस्रायलमधील कट्टर धार्मिक झेनॉनिस्ट शक्ती या युद्धाची व्याप्ती वाढविण्याची कृती करत आहेत. अशा स्थितीत इतर अरब देशांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. आम्हाला आधार दिल्यास आम्ही या शक्तींचा बिमोड करण्यास समर्थ आहोत, असे आवाहन इराणच्या प्रशासनाने इतर अरब देशांना केले आहे.
परतले काही भारतीय
कुवेत आणि दुबई येथून मंगळवारी 149 भारतीय भारतात सुखरुप परतले आहेत. या दोन देशांनी काही विमानांना उ•ाण करण्यासाठी अनुमती दिली होती. अशी चार विमाने दिल्लीत पोहचली असून त्यांच्यातून हे भारतीय परतले आहेत. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू याही सुखरुप परतल्यानंतर त्यांनी त्यांचे थरारक अनुभव कथन केले. अन्य अनेक भारतीयांनी या युद्धाच्या अनुभवांची वर्णने केली. शेकडो क्षेपणास्त्रांचा पाऊस दुबईवर पडत होता. त्यातील एक जरी आमच्या इमारतीवर आदळले असते, तरी अनेकांचा जीव गेला असता, अशा शब्दांमध्ये परतलेल्या एका प्रवाशाने स्थिती स्पष्ट केली. बुधवारी आणखी काही विमाने भारतीयांना घेऊन परततील, अशी शक्यता भारताने व्यक्त केली आहे
इराणच्या प्रगतीत चीनचे महत्त्वपूर्ण योगदान
या युद्धकाळात पडलेला सर्वात मोठा प्रश्न, इराणकडे इतक्या क्षेपणास्त्रांचा साठा कसा निर्माण झाला आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार याचे उत्तर चीन हे आहे. चीनने गेली 10 ते 15 वर्षे इराणला मोठ्या प्रमाणात युद्धसामग्री आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान पुरविले आहे. तसेच, इराणची मोठी युद्ध यंत्रणा निर्माण करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे इराण या युद्धात अद्याप मागे हटलेला नाही. इराण थेट अमेरिकेवर हल्ला करू शकत नाही. तथापि, चीनने दिलेली युद्धसामग्री आणि चीनचे तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने तो अमेरिकेचे मित्र असलेल्या अन्य अरब देशांवर हल्ले करत आहे. या देशांना हे हल्ले असह्या झाले, की ते अमेरिकेवर दबाव आणून अमेरिकेचे इराणवर होणारे हल्ले थांबविण्यास भाग पाडतील, असे इराणचे धोरण असल्याचे दिसून येते. यासंबंधीचे चित्र काही काळातच स्पष्ट होईल.
इराणमध्ये 9 हजार भारतीय
इराणमध्ये सध्या 9 हजार भारतीय अडकलेले असून त्यांना तेथून सुखरुप बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न चालविलेले आहेत. इराणच्या भारतातून राजदूतावासाशी संपर्क ठेवण्यात येत आहे. तसेच, तेथील भारतीयांनी नियमांचे पालन करून स्वत:ची सुरक्षा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले. हल्ल्यांमधून उसंत मिळताच तेथील भारतीयांना प्रथम शेजारच्या देशांमध्ये आणण्यात येईल. नंतर त्यांना भारतात आणण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी योजना आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नेत्यांशी चर्चा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी आखाती देशांच्या नेत्यांची चर्चा केली. प्रथम त्यांनी ओमानचे प्रमुख हैदम बिन तारीक यांच्याशी संपर्क साधून तेथील भारतीयांच्या सुरक्षेसंबंधात विचारणा केली. नंतर त्यांनी कुवेतचे राजपुत्र सबाह अल् खालेद यांना दूरध्वनी करून तेथील भारतीयांच्या सुरक्षेसंदर्भात बोलणी केली. इराणने या देशांवरही हल्ले केले आहेत. या हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला. या देशांवर हल्ले केल्याने काहीही साध्य होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती दिली गेली.
थांबण्याची चिन्हे दूरच...
ड अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध लवकर थांबणे दुरापास्त
ड जागतिक बाजारात तेलाच्या दरात 15 टक्के वाढ, 85 डॉलर प्रतिबॅरल
ड तेलाची आवश्यकता भागविण्यासाठी भारताकडून विविध पर्यायांची सज्जता
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुवेत आणि ओमान प्रमुखांशी दूरध्वनी चर्चा
ड इराणच्या अणुकेंद्रावर इस्रायलचे पुन्हा हल्ले, मात्र किरणोत्सर्जन सुरक्षित
ड इस्रायलचे लेबेनॉनवर जोरदार हल्ले, हिजबुल्लाची अनेक केंद्रे धाराशायी